“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:29 IST2025-12-24T18:26:16+5:302025-12-24T18:29:50+5:30
BJP President Nitin Nabin News: राहुल गांधी केवळ निवडणुकांपुरते येतात आणि सुट्ट्यांसाठी परदेशात जातात. परदेशात जाऊन देशाविरोधात बोलतात, अशी टीका नितीन नबीन यांनी केली.

“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
BJP President Nitin Nabin News:भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला आहे. राहुल गांधी यांच्यासारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका. कठोर मेहनत घेत राहा, असे म्हटले आहे.
पंचायतपासून ते संसदेपर्यंत भाजपा झेंडा मजबूत करण्यासाठी कठोर मेहनत घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नेतृत्वाचे आभार मानतो की, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांला एवढा मोठा सम्मान दिला. पार्ट टाइम राजकारण्यांना जागा दाखवण्याची प्रक्रिया बिहारपासून सुरू झाली आहे. हाच क्रम पश्चिम बंगाल आणि केरळ येथेही कायम राहणार आहे, असे नितीन नबीन यांनी म्हटले आहे.
पूर्णवेळ राजकारणी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे
राहुल गांधी यांच्यासारखे पार्ट टाइम राजकारणी बनू नका. ते देशात राहून निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांवर टीका करतात आणि परदेश दौऱ्यावर जाऊन मातृभूमिविषयी चुकीचे उद्गार काढतात. केवळ निवडणुकांपुरते राहुल गांधी बिहारमध्ये येतात आणि सुट्टीसाठी जर्मनीला जातात, अशी टीका नितीन नबीन यांनी केली. आपले लक्ष्य केवळ विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवणे एवढेच नाही, तर पंचायतपासून ते संसदेपर्यंत भगवा ध्वज फडकवणे आहे. आपण सगळ्यांनी पूर्णवेळ राजकारणी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेही नितीन नबीन म्हणाले.
दरम्यान, राजद नेते तेजस्वी यादव यांचे नाव न घेता नितीन नबीन यांनी निशाणा साधला. बिहारमध्ये आणखी एक पार्ट टाइम राजकारणी आहे. ते अलीकडे झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहिले नाहीत. पण परदेश दौऱ्याचा आनंद लुटत होते. तळागाळात पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक संस्था आणि पंचायत निवडणुकांची तयारी सुरू करावी, अशी सूचनाही नितीन नबीन यांनी कार्यकर्त्यांना केल्या.