...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 15:26 IST2019-12-24T15:23:33+5:302019-12-24T15:26:46+5:30
मोदींचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देतात; भाजपा नेत्याचं शरसंधान

...तर लवकरच भारत भाजपामुक्त होईल; बड्या नेत्याकडून भाजपाला घरचा आहेर
नवी दिल्ली: झारखंडमधील पराभवामुळे भाजपाच्या गोटात चिंतेचं वातावरण असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनी घरचा आहेर दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था अतिशय वाईट आहे. आर्थिक आघाडीवर वेळीच योग्य पावलं उचलली न गेल्यास देश भाजपामुक्त होईल, असा इशारा स्वामींनी भाजपा नेतृत्त्वाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार त्यांना अंधारात ठेवत असल्याचंदेखील स्वामींनी म्हटलं आहे.
'अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न न केल्यास भारत भाजपामुक्त होईल. मोदींचे सल्लागार कोण आहेत याबद्दल मला माहिती नाही. मात्र ते त्यांना सत्य परिस्थिती सांगत नाहीत. मोदींना अंधारात ठेवण्याचं काम त्यांच्या सल्लागारांकडून सुरू आहे', अशा शब्दांत स्वामींनी स्वत:च्याच सरकारवर टीका केली. झारखंडमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर स्वामींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.
काल झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्यात विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. यापैकी केवळ २५ जागा जिंकण्यात भाजपाला यश आल्यानं त्यांना सत्ता गमवावी लागली. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीनं ४७ जागा जिंकल्या. झारखंड मुक्ती मोर्चानं ३०, काँग्रेस १६, तर राष्ट्रीय जनता दलानं एक जागा जिंकली. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला आहे.