bjp mp subramanian swamy hits out at modi government over economy | देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं; स्वामींचा टोला

देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायलादेखील डोकं लागतं; स्वामींचा टोला

नवी दिल्ली: देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडल्यानं विरोधकांकडून वारंवार मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. एकीकडे विरोधकांकडून टीका होत असताना आता दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनीदेखील स्वपक्षावर टीकेचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीदेखील डोकं लागतं, असा टोला स्वामींनी लगावला आहे. 

भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी अर्थव्यवस्थेवरुन मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'सामान्यपणे मंदी महागाई सोबत येत नाही. मागणीत घट झाल्यानंतर सामान्यपणे वस्तूंच्या किमती वाढत नाहीत. मात्र आता भारताच्या अर्थव्यवस्थेत या साऱ्या त्रुटी पाहायला मिळत आहेत. या प्रकारे अपयशी ठरायलादेखील डोकं लागतं', असं या परिस्थितीवर मला गमतीनं म्हणावंसं वाटतं,' असं स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी स्वामींनी डॉलरच्या तुलनेत सतत कोसळणाऱ्या रुपयावर भाष्य करताना अजब सल्ला दिला होता. भारतीय रुपयाचं मूल्य वधारण्यासाठी त्यावर लक्ष्मी मातेचं चित्र छापायला हवं, असं विधान स्वामींनी केलं होतं. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर बोलू शकतात. मात्र नोटांवर लक्ष्मी मातेचं चित्र असावं असं माझं मत आहे. तसं केल्यास भारतीय चलनाची स्थिती सुधारेल. याबद्दल कोणीही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही,' असं स्वामी म्हणाले होते. 
 

Web Title: bjp mp subramanian swamy hits out at modi government over economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.