सभागृह सुन्न! भाजप खासदाराने बाकावर काढून ठेवले कृत्रिम पाय, सांगितला ३१ वर्षांपूर्वीचा तो भयानक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:33 IST2026-02-03T10:21:33+5:302026-02-03T10:33:45+5:30
पहिल्याच भाषणात भाजप खासदार सदानंदन मास्टर यांनी राज्यसभत बाकावर आपले कृत्रिम पाय काढून ठेवले.

सभागृह सुन्न! भाजप खासदाराने बाकावर काढून ठेवले कृत्रिम पाय, सांगितला ३१ वर्षांपूर्वीचा तो भयानक अनुभव
BJP MP Sadanand Master: सोमवारी राज्यसभेत एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपचे खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी भाषणादरम्यान चक्क त्याचे आर्टिफिशियल पाय काढून सभागृहाच्या बाकावर ठेवले. लोकशाहीचा खरा चेहरा देशाला दाखवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले, ज्यामुळे सभागृहात काही काळ तणाव आणि नंतर प्रचंड भावूक वातावरण निर्माण झाले.
"माझे पाय कापले अन् इंकलाबच्या घोषणा दिल्या..."
आपल्या पहिल्याच भाषणात सदानंदन मास्टर अत्यंत आक्रमक आणि भावूक झाले होते. ३१ वर्षांपूर्वी केरळमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देताना ते म्हणाले, "जे लोक आज लोकशाहीसाठी गळा काढून ओरडत आहेत, त्यांनीच ३१ वर्षांपूर्वी केरळमध्ये माझ्यावर जीवघेणा हल्ला केला होता. मी घरी परतत असताना गुन्हेगारांनी मला पाडले आणि इंकलाब जिंदाबादच्या घोषणा देत माझे दोन्ही पाय कापून टाकले. आरएसएसशी संबंधित असलेल्या सदानंदन यांनी या क्रूर कृत्याचा थेट आरोप सीपीएम कार्यकर्त्यांवर केला.
सभागृहात जोरदार गदारोळ आणि आक्षेप
सदानंदन मास्टर यांनी बाकावर पाय ठेवताच सीपीएम खासदार जॉन ब्रिटास यांनी नियमावलीचा हवाला देत तीव्र आक्षेप घेतला. सभागृहात कोणत्याही वस्तूचे प्रदर्शन करण्यास मनाई असल्याचे सांगत त्यांनी मास्टर यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर प्रत्युत्तर देताना मास्टर म्हणाले, "तुम्ही नेहमी मानवता आणि सहिष्णुतेच्या गप्पा मारता, पण तुमची निष्ठा राजकीय हिंसेवर आधारित आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे."
अखेर, सभापतींच्या सूचनेनंतर त्यांनी कृत्रिम पाय टेबलावरून हटवले. मात्र, या वादादरम्यान वापरण्यात आलेले काही शब्द कामकाजातून हटवण्याची विनंती सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी केली.
यातनेमुळे मी उभा राहून भाषण करू शकलो नाही- सदानंदन मास्टर
आपल्या भाषणाचा शेवट करताना सदानंदन मास्टर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने एक विधान केले. ते म्हणाले की, "मला खेद वाटतोय की, सीपीआय-एमने दिलेल्या त्या यातनांमुळे आज मला माझे पहिले भाषण देताना उभे देखील राहता आले नाही." त्यांच्या या विधानाने सभागृहातील अनेक सदस्य सुन्न झाले.
कोण आहेत सदानंदन मास्टर?
सी. सदानंदन मास्टर हे केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी शिक्षक आहेत. त्यांची ओळख केरळ भाजपचे उपाध्यक्ष म्हणूनही आहे. १२ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली. २१ जुलै २०२५ रोजी त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली होती.