bjp mp from indore celebrated netaji chandrashekhar bose birth anniversary instead of subhash chandra bose | ...अन् भाजपच्या खासदारानं साजरी केली 'नेताजी चंद्रशेखर बोस' जयंती

...अन् भाजपच्या खासदारानं साजरी केली 'नेताजी चंद्रशेखर बोस' जयंती

भोपाळ: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती काल देशभरात साजरी झाली. बोस यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षानं देशाच्या विविध भागांत 'पराक्रम दिवस' साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात जाऊन नेताजी भवनला भेट दिली. त्यानंतर एका कार्यक्रमातदेखील सहभाग घेतला. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील उपस्थित होत्या.

संपूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत असताना भाजपचे इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी 'नेताजी चंद्रशेखर बोस' जयंती साजरी केली. बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लालवानी नेताजींसारखी टोपी घालून आले होते. मात्र भाषण देत असताना त्यांनी नेताजींना 'चंद्रशेखर आझाद' म्हटलं. त्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं आणि नेताजींना 'चंद्रशेखर बोस' म्हणाले. पण त्यांनी एकदाही त्यांच्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं नाही.

"काँग्रेसनं सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; त्यांची लोकप्रियता नेहरू-गांधींपेक्षा अधिक होती"

इंदूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लालवानी यांनी नेताजींच्या कर्तृत्त्वाचं वर्णन केलं. 'नेताजींनी नोकरी सोडून देशाची सेवा केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिलं. इंग्रजांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू करताच वेशांतर करून ते देशाबाहेर गेले आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी सैनिक गोळा केले. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. अशा नेताजी चंद्रशेखर आझाद... चंद्रशेखर बोस यांची जयंती आपण साजरी करत आहोत,' असं लालवानी भाषणात म्हणाले.''काँग्रेसच्या लोकांनी नेताजींचा खून केला''
आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला. काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचं ते म्हणाले. बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त साक्षी महाराज उत्तर प्रदेशातल्या उन्नवमध्ये बोलत होते.

सुभाषचंद्र बोस यांचा अकाली मृत्यू झाला. काँग्रेसच्या लोकांनीच त्यांची हत्या घडवून आणली, असा माझा आरोप आहे. बोस यांची लोकप्रियता अतिशय जास्त होती. त्यांची लोकप्रियता पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक होती. बोस यांच्या लोकप्रियतेसमोर महात्मा गांधीही कुठेच नव्हते, असं साक्षी महाराज म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bjp mp from indore celebrated netaji chandrashekhar bose birth anniversary instead of subhash chandra bose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.