त्रस्त नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजपा खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 17:47 IST2018-08-04T17:46:51+5:302018-08-04T17:47:59+5:30
खासदाराच्या मागणीनंतर लोकसभेत एकच हशा पिकला

त्रस्त नवऱ्यांसाठी आयोग स्थापन करा; भाजपा खासदाराची मागणी
नवी दिल्ली: पत्नीच्या त्रासामुळे मनस्ताप भोगणाऱ्यांसाठी पुरुष आयोगाची स्थापना करा, अशी मागणी भाजपाचेखासदार हरीनारायण राजभर यांनी केली आहे. लोकसभेत शून्य प्रहरात राजभर यांनी पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला. महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर लोकसभेत एकच हशा पिकला.
उत्तर प्रदेशातील घोसी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे खासदार हरीनारायण राजभर यांनी लोकसभेत पुरुषांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा मुद्दा मांडला. 'पत्नीच्या त्रासाचा सामना कराव्या लागणाऱ्या पुरुषांसाठी विशेष आयोग स्थापन करा,' असं राजभर लोकसभेत म्हणाले. या आयोगाला पुरुष आयोग असं नाव देण्यात यावं, असंदेखील ते म्हणाले. सरकारनं विविध समुदायांसाठी आयोग स्थापन केले आहेत. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी महिला आयोगाचीही स्थापना करण्यात आली आहे. पण पुरुषांसाठी कोणताही आयोग नाही, असं राजभर यांनी म्हटलं.
'पत्नींकडून होणाऱ्या त्रासानं मनस्ताप सहन करणाऱ्या पुरुषांची संख्या लक्षणीय आहे. पत्नींच्या आरोपांमुळे तुरुंगाची हवा खात असलेल्या पुरुषांचं प्रमाणदेखील मोठं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना करण्यात यावी,' असं राजभर म्हणाले. त्यांची मागणी ऐकून सभागृहातील अनेकांना हसू आवरता आलं नाही.