गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:23 IST2020-03-03T14:08:05+5:302020-03-03T14:23:29+5:30
भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्राने आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता.

गोमुत्र, शेणाने रोखता येऊ शकतो कोरोना व्हायरस; भाजप आमदारांचा अजब दावा
नवी दिल्ली - जगभरातील शास्त्रज्ञ मानव जातीवर संकट होऊ पाहणाऱ्या कोरोना व्हायरसवर उपचार शोधत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या आसाममधील आमदार सुमन हरिप्रिया यांनी कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी गोमुत्र आणि शेण उपयोगी असल्याचा दावा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सुमन यांनी गोमुत्र आणि शेणाने कर्करोगासारखे आजार बरे होत असल्याचा दावा केला. राज्य विधानसभेच्या बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी चर्चेच्या वेळी त्यांनी हा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, आपल्या सर्वांना ठावूक आहे की गाईचं शेण किती उपयोगी आहे. तर गोमुत्राचा उपयोग परिसर शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येते. मला असं वाटतं की, गोमुत्र आणि शेणाने कोरोना व्हायरस देखील बरा होईल, असं आमदार सुमन यांनी म्हटले.
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूचा आकडा तीन हजारवर पोहोचला आहे. तर कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. मृतांची संख्या हुबई प्रांतात अधिक आहे. भारतात देखील कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहे. हे रुग्ण परदेशातून भारतात आले आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान भाजप आमदार सुमन हरिप्रिया यांच्या दाव्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी देखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्राने आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता.