पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत, कुंभमेळ्याला 'मृत्यू कुंभ' असे संबोधले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या या विधानाचा, देशभरातील संत समाज निषेध करत आहे. तर भाजप खासदारांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांनीच ममता बॅनर्जी यांना निशाण्यावर घेतले आहे. दिल्लीतील एका भाजप आमदाराने तर ममता बॅनर्जी यांचे नावच बदलले आहे.
मुस्तफाबादचे आमदार मोहन सिंह बिष्ट ममतांवर निशाणा साधताना न्यूज18 इंडिया सोबत बोलदाना म्हणाले, "ममता बॅनर्जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे नाव ममता आहे, पण त्यांचे नाव 'क्रूकता' ठेवायला हवे. त्यांनी ज्या पद्धतीच्या शब्दांचा वापर केला, हे योग्य नाही. ज्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाचा अंत झाला, अगदी त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात ममताही जाणार...
नेमकं काय म्हणाल्या होत्या ममता बॅनर्जी? -महाकुंभ हा 'मृत्युकुंभ' बनला असल्याची टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत केली होती. त्या म्हणाल्या होत्या, "महाकुंभात चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या असून, त्यातील मृतांची खरी संख्या उत्तर प्रदेश सरकार लपवत आहे. प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३० लोकांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाले होते." याशिवाय, "बांगलादेशमधील दहशतवाद्यांशी तृणमूल काँग्रेस नेत्यांचे संबंध असल्याचा भाजपने केलेला आरोप कोणी सिद्ध केला तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. भाजप धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. परंतु, माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. अवैध स्थलांतर केल्याप्रकरणी अमेरिकेतून भारतात पाठविलेल्या लोकांच्या हाता-पायात बेड्या घालणे, हे अमानूष व लाजिरवाणे असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी केली होती."
मुस्तफाबादचे नाव बदलण्यासंदर्भात काय म्हणाले? -भाजप आमदार मोहन सिंह बिष्ट म्हणाले, मला पद मिळो अथवा न मिळो, मुस्तफाबादचे नाव तर बदलणारच. कारण 58 टक्के लोकांची ही मागणी आहे. त्याचे नाव आता सध्या राहत असलेल्या 42 टक्के लोकांच्या मर्जीनुसार असणार नाही. लोकांची इच्छा आहे म्हणून मुस्तफाबाद विधानसभेचे नाव बदलले जाणार. ते म्हणाले, दिल्लीचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, कमळाच्या फुलाचा असेल आणि दिल्लीतील 48 आमदारांतून निवडला जाईल.