“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 09:25 IST2020-05-24T09:24:27+5:302020-05-24T09:25:00+5:30
नरेंद्र मोदींच्या आरती लॉन्चवरुन काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडलं.

“जो मोदी जी की आरती गावे, भारत देश परमपद पावे”; भाजपा मंत्र्याकडून नरेंद्र मोदींची आरती लॉन्च
देहरादून – देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातून अजबगजब प्रकारही समोर येत आहे. उत्तराखंड सरकारमधील मंत्र्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणारी आरती लॉन्च केली आहे. सध्या ही आरती सोशल मीडियावरील लोकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. मात्र मंत्र्याच्या या कार्यावर उत्तराखंड प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गरिमा दसौनी यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे.
गरिमा म्हणाले की, उत्तराखंड राज्यमंत्री धनसिंग रावत आणि गणेश जोशी यांच्या या कृत्याने संपूर्ण हिंदू सनातन धर्माचा अपमान केला आहे. मोदी एक माणूस आहेत आणि त्यांना देवी-देवतांच्या श्रेणीत स्थान दिले जाऊ शकत नाही. मोदींची स्तुती करताना आरतीमध्ये वापरलेले शब्द त्यांचे देव म्हणून वर्णन करतात असा आरोप त्यांनी केला.
तसेच जे लोक काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करीत होते ते आज एका व्यक्तीपुरते मर्यादित झाले आहेत आणि त्यांच्या पादुका पूजेसाठी कोणत्याही पातळीवर येऊ शकतात. गरिमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत यांच्याकडे या प्रकाराची दखल घेत या दोघांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे.
त्याचसोबत या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी युवक कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेस भवनात निदर्शने केली. महिला कॉंग्रेसने नेहरू कॉलनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.