17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 19:01 IST2025-09-25T18:52:24+5:302025-09-25T19:01:05+5:30
महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी या बदलांना हिरवा कंदील दिल्याचेही बोलले जात आहे.

17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
भारतीय जनता पक्षाचा अर्थात भाजपचा सर्वात मजबूत गड असलेल्या गुजरातमध्ये दिवाळीपूर्वीच मोठा राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे या चर्चांना अधिक उधान आले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि चार ते पाच महत्त्वाचे मंत्री वगळता मंत्रिमंडळातील इतर सर्व मंत्र्यांची 'सुट्टी' होण्याची शक्यता आहे.
सध्या गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह १७ मंत्री आहेत, यांपैकी १०-१२ मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. खरे तर, त्यांना ज्या विश्वासाने मंत्री बनवण्यात आले होते, त्यावर ते खरे उतरू शकले नाही, अशी चर्चा आहे. २०२२ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झालेला नाही. महत्वाचे म्हणजे, आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदलासंदर्भात चर्चा होत आहे.
यासंदर्भात, नवभारत टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलात जयेश रादडिया, अल्पेश ठाकोर, अमित ठाकर, आणि हार्दिक पटेल यांसारख्या तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अर्जुन मोढवाडिया यांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, वडोदरा येथून केयूर रोकडिया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. कारण ते पूर्वी महापौर होते. यामुळे त्यांना शहराच्या समस्यांची चांगली जाण आहे.
हे राहू शकतात कायम -
१. भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री
२. हर्ष संघवी, गृह राज्यमंत्री
३. जगदीश विश्वकर्मा, सहकार मंत्री
४. ऋषिकेश पटेल, आरोग्य मंत्री
५. बलवंतसिंग राजपूत, उद्योग मंत्री
महत्वाचे म्हणजे, गृहमंत्री अमित शहा यांनी या बदलांना हिरवा कंदील दिल्याचेही बोलले जात आहे. गुजरात भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणाही लवकरच होणे अपेक्षित आहे.
अशा एकंदरित पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवारी होणार आहे. अमित शाह यांच्या पाटील यांच्या निवासस्थानावरील भेटीमुळे या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व असेल. भाजपमध्ये लवकरच अंतर्गत 'सर्जरी' होण्याची शक्यता आहे.