तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 23:12 IST2021-07-05T23:10:13+5:302021-07-05T23:12:03+5:30

राज्यातील इतर दोन खासदारांची नावंदेखील मंत्रिपदासाठी चर्चेत

bjp leadership calls mp narayan rane to delhi likely to get ministerial birth in modi government | तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित

तातडीनं दिल्लीला या! राज्यातील 'या' खासदाराला भाजप नेतृत्त्वाचा फोन; मंत्रिपद जवळपास निश्चित

नवी दिल्ली/मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोदी सरकार २.० मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ मंत्र्यांकडे अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीनं दिली आहे. त्यामुळे राणे उद्याच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राणेंनी या विषयावर काम केलं. आताही ते या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. याशिवाय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. त्याचा विचार करूनही राणेंना मंत्रिपद देण्यात येईल असं बोललं जातं. राणे यांच्यासोबत रणजीत नाईक निंबाळकर आणि हिना गावित यांच्या नावांचीदेखील मंत्रिपदासाठी चर्चा आहे.

Web Title: bjp leadership calls mp narayan rane to delhi likely to get ministerial birth in modi government