संकटाच्या काळात भाजपचे नेते गायब होतात; राज्यात चक्रीवादळ आले तेव्हा कुठे होते? ममतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:41 IST2021-03-19T04:20:52+5:302021-03-19T06:41:07+5:30
पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात.

संकटाच्या काळात भाजपचे नेते गायब होतात; राज्यात चक्रीवादळ आले तेव्हा कुठे होते? ममतांचा हल्लाबोल
गडबेता (प. बंगाल) : अम्फान चक्रीवादळानंतर आमच्या सरकारने लोकांना सर्वतोपरी मदत केली. मात्र, भाजपचे नेते संकटाच्या काळात कुठेच दिसले नाहीत, अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (BJP leaders disappear in times of crisis Mamata's attack)
पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांना तृणमूलच्या सरकारने हजारो कोटी रुपयांची मदत केली. एखादा अपवाद असू शकतो. मात्र, आम्ही लोकांच्या मदतीसाठी पोहोचलो तेव्हा भाजपचे लोक कुठे होते, असा सवाल करून त्या म्हणाल्या की, संकटाच्या काळात ते नेहमीच गायब असतात.
प. बंगालमध्ये एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) लागू होऊ देणार नाही. कारण, नोंदणी करताना लोक जर घरी नसतील, तर भाजप मतदारांची नावे हटवून टाकेल. देशातील कोणत्याही नागरिकाला प. बंगालमधून बाहेर काढले जाणार नाही. भाजप हा दंगेखोरांची पार्टी आहे, असे सांगत त्या म्हणाल्या की, आम्हाला हिंसा नकोय. रक्तपात नकोय. राज्यात सूडाचे राजकारण आम्हाला
नकोय.
मुकुल रॉय वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात
- भारतीय जनता पक्षाने अखेरच्या चार टप्प्यांमधील १५९ पैकी १४८ उमेदवारांची यादी गुरुवारी जारी केली. त्यात तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणारे हेवीवेट नेते मुकुल रॉय व त्यांचे चिरंजीव शुभ्रांगशू, आणखी की विद्यमान खासदार जगन्नाथ सरकार आदींचा समावेश
आहे.
- मुकुल रॉय हे वीस वर्षांनंतर विधानसभेच्या रिंगणात उतरत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यामधील भवानीपूर मतदारसंघात भाजपने अभिनेता रूद्रनील घोष यांना उतरवले आहे. त्यांचा सामना तृणमूलचे ज्येष्ठ नेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्याशी आहे.