‘बाबरीप्रमाणे ज्ञानवापी मशीदही उद्ध्वस्त करू’, भाजपा नेते संगीत सोम यांची उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 14:42 IST2022-05-10T14:41:50+5:302022-05-10T14:42:34+5:30
Gyanvapi Masjid News: भाजपाचे माजी आमदार Sangeet Som यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करण्याबाबत बोलत असताना ऐकू येत आहे.

‘बाबरीप्रमाणे ज्ञानवापी मशीदही उद्ध्वस्त करू’, भाजपा नेते संगीत सोम यांची उघड धमकी
लखनौ - भाजपाचे माजी आमदार संगीत सोम यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करण्याबाबत बोलत असताना ऐकू येत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये संगीत सोम यांनी कथितपणे सांगितले की, १९९२ मधील बाबरी मशिदीप्रमाणे २०२२ मध्ये ज्ञानवापी मशीदही उद्ध्वस्त करू.
हा व्हिडीओ मेरठच्या ज्वालागड येचे आयोजित महाराणा प्रताप जयंती समारोहामधील असल्याचे दिसत आहे. मात्र या व्हिडीओच्या सत्यतेची पडताळणी झालेली नाही. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून सहभागी झालेले भाजपाचे माजी आमदार संगीत सोम या व्हिडीओमध्ये आक्रमक भाषण देताना दिसत आहेत. त्यामध्ये ते सांगतात की, त्यांनी त्याच दिवशी समजून गेलं पाहिजे होतं, ज्या दिवशी १९९२ मध्ये त्या वास्तूला उद्ध्वस्त केलं होतं. त्याचवेळी त्यांची समजून घेतलं पाहिजे होतं की, देश कुठल्या दिशेने जात आहे.
संगीत सोम म्हणाले की, रामलल्ला अनेक वर्षे तंबूत राहिले. अखेर एकेदिवशी जेव्हा लोकांच्या संयमाचा बांध फुटला तेव्हा त्या वादग्रस्त वास्तूची एकही वीट जागेवर राहिली नाही. ते वर्ष १९२२ होते आज २०२२ आहे. औरंगजेबासारख्या लोकांनी मंदिर तोडून ज्ञानवापी मशीद तयार केली. आता मंदिर परत घेण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले की, बनारसमध्ये भगवान काशिनाथांचं मंदिर तयार केलं जाईल. आता काशिनाथ मंदिराला त्याच रूपात आणलं जाईल. ज्ञानवापी मशिदीला ध्वस्त करून भगवान भोलेनाथांचं कुटुंब वसवून संपूर्ण मंदिर तयार केलं जाईल.
संगीत सोम यांनी या कार्यक्रमाचे काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. तिथे ते म्हणतात की, औरंगजेबासारख्या लोकांनी ज्ञानवापी मशीद तयार केली. ९२ मध्ये बाबरी आता २२ मध्ये ज्ञानवापीची वेळ आहे. मुस्लिम आक्रमकांनी मंदिर तोडून जी मशीद उभी केली होती तिला परत मिळवण्याची वेळ आली आहे. मात्र संगीत सोम यांचं हे ट्विटर हँडल व्हेरिफाई़ड नाही आहे.