कोरोना संकटातच काँग्रेस-भाजपा आमनेसामने, सोनिया गांधींच्या 'द्वेषाचा व्हायरस' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 20:01 IST2020-04-23T19:36:10+5:302020-04-23T20:01:30+5:30
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस योग्य भूमिका घेण्या ऐवजी विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेस जाणूनबुजून, असे करत आहे.

कोरोना संकटातच काँग्रेस-भाजपा आमनेसामने, सोनिया गांधींच्या 'द्वेषाचा व्हायरस' वक्तव्यावर भाजपाचा पलटवार
नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढाई सुरू असतानाच आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपावर द्वेषाचा व्हायरस पसरवत असल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 'काँग्रेस विभाजनाचे राजकारण करत आहे. संकटाच्या काळात काँग्रेसने सकारात्मक सहकार्य करायला हवे. मात्र, असे वक्तव्य करून सोनिया गांधी सांप्रदायिक राजकारण करत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेच्या सहकार्याने कोरोनाशी लढत आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस योग्य भूमिका घेण्या ऐवजी विभाजनाचे राजकारण करत आहे. काँग्रेस जाणूनबुजून, असे करत आहे. याचा जनतेला त्रास होतो. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचे खंडन करतो. संकटाच्या काळात काँग्रेसने मदतीसाठी पुढे यायला हवे. मात्र, ते केवळ अशापद्धतीची वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत.
काय म्हणाल्या होत्या सोनिया गांधी -
मला तुमच्यासोबत असे काही शेअर करायचे आहे, ज्याची प्रत्येक भारतीयाने चिंता करण्याची गरज आहे. जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाशी लढा देणे अपेक्षित आहे, तेव्हा भाजपा मात्र जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवत आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. लॉकडाऊनमध्ये 12 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. त्यामुळे गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने त्वरित 7,500 रूपये जमा करावेत, अशी मागणीही यावेळी सोनिया गांधी यांनी केली होती.