भोपाळ: भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय यांनी इंदूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बॅटनं मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याबद्दल कैलाश विजयवर्गीय यांना प्रश्न विचारण्यात आला. मारकुट्या मुलाबद्दल प्रश्न विचारल्यानं कैलाश विजयवर्गीय संतापले आणि त्यांनी पत्रकाराची लायकी काढली. दुर्घटना घडू नये यासाठी धोकादायक घरं तोडण्याचं काम इंदूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होतं. त्यावेळी आकाश विजयवर्गीय यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बॅटनं मारहाण केली. मुलाच्या या कृत्याबद्दल कैलास विजयवर्गीय यांना एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं प्रश्न विचारला. यावर माझा मुलगा कोणतंही चुकीचं कृत्य करू शकत नाही, असं उत्तर विजयवर्गीय यांनी दिलं. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्याची आठवण पत्रकारानं विजयवर्गीय यांना करुन दिली.पत्रकाराच्या प्रश्नानंतर कैलास विजयवर्गीय खवळले आणि तुम्ही न्यायाधीश आहात का, असा प्रतिप्रश्न केला. यानंतरही पत्रकारानं तुम्हाला तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न वारंवार विचारला. त्यावर तुमची लायकी काय, असा प्रश्न करत विजयवर्गीय यांनी पातळी सोडली. आकाश विजयवर्गीय सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना जामीन देण्यास नकार दिला. आकाश विजयवर्गीय याआधी अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत.
तुमची लायकी काय? 'बॅटमॅन' पुत्राबद्दल प्रश्न विचारल्यानं भाजपा नेत्याचा पारा चढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 07:46 IST