७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 09:42 IST2025-01-29T09:41:43+5:302025-01-29T09:42:02+5:30
२०२२-२३ या कालावधीत भाजपने केलेल्या १०९२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये खर्चात ६० टक्के वाढ झाली.

७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष अशी स्वत:ची ओळख करून देणारा भाजप हा देशातील सर्वांत श्रीमंत राजकीय पक्ष बनला असून ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्याच्याकडे ७११३.८० कोटी रुपयांचा निधी आहे, तर काँग्रेसकडे ८५७.१७ कोटी रुपयांचा निधी असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
भाजपने २०२३-२४ या कालावधीत १७५४.०६ कोटी रुपये खर्च केले. २०२२-२३ या कालावधीत भाजपने केलेल्या १०९२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये खर्चात ६० टक्के वाढ झाली, तर काँग्रेसने २०२३-२४मध्ये ६१९.६७ कोटी रुपये खर्च केले. २०२२-२३मध्ये हे प्रमाण १९२.५६ कोटी रुपये होते. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या वार्षिक अहवालानुसार २०२३-२४मध्ये भाजपला निवडणूक रोख्यांच्या रूपाने १६८५.६९ कोटी रुपयांच्या ऐच्छिक देणग्या मिळाल्या. हेच प्रमाण २०२२-२३मध्ये १२९४.१५ कोटी रुपये होते. निवडणूक रोख्यांवर आता सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. २०२३-२४या वर्षामध्ये भाजपला सर्व मिळून २०४२.७५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. काँग्रेस पक्षाला २०२३-२४मध्ये १२२५.११ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.
काँग्रेसचा भारत जोडो यात्रा-२ वर ४९.६३ कोटींचा खर्च
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा २ च्या आयोजनासाठी २०२३-२४ या कालावघीत ४९.६३ कोटी रुपये, तर त्याआधीच्या भारत जोडो यात्रेवर ७१.८४ कोटी रुपयांचा खर्च पक्षाने केला होता.
भाजपचा जाहिरातींवर ५९१ कोटींचा खर्च
२०२३-२४मध्ये भाजपने जाहिरातींवर ५९१ कोटी रुपये खर्च केले. त्यातील ४३४.८४ कोटी इलेक्ट्रॉनिक माध्यमातील व ११५.६२ कोटी रुपये मुद्रित माध्यमांतील जाहिरातींवर खर्च झाले.
पक्षाने २०२३-२४ या वर्षात हेलिकॉप्टर, विमान प्रवासासाठी १७४ कोटी रुपयांचा खर्च केला. भाजपने या वर्षात उमेदवारांना १९१.०६ कोटी रुपयांची मदत केली. भाजपने २०२४मध्ये सभांच्या आयोजनासाठी ८३.३२ कोटी रुपये तर मोर्चे, आंदोलने, काॅल सेंटर आदी गोष्टींकरिता ७५.१४ कोटी खर्च केले.