भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 18:10 IST2023-06-09T18:06:46+5:302023-06-09T18:10:20+5:30
Nitish Kumar Vs BJP: भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.

भाजपाच्या केवळ ४० जागा घटवायच्या, मग मोदींचा पराभव निश्चित, नितीश कुमारांनी आखली खास रणनीती
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी ऐक्यामध्ये मैलाचा दगड ठरणारी भाजपाविरोधी पक्षांची २३ जूनला होणारी बैठक देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकणार आहे. नितीश कुमार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत. भाजपाविरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपाला २०२४ मध्ये पराभूत करता येईल, असा दावा नितीश कुमार वारंवार करत आहेत. दरम्यान, भाजपा आणि मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी नितीश कुमार यांनी खास रणनीती आखली आहे.
२३ जून रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी नितीश कुमार यांचा मार्ग तितकासा सोपा नव्हता. नितीश कुमार यांनी विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपाला पराभूत करता येऊ शकते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार नाहीत. भाजपाच्या केवळ ४० जागा कमी करायच्या. म्हणजे भाजपा अल्पमतात जाईल. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या जागा घटू शकतात, असा दावा त्यांनी केला.
ललन सिंह म्हणाले की, भाजपाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. तसेच काही राज्यांमध्ये भाजपाने कमाल जागा जिंकलेल्या आहेत. यापेक्षा अधिक जागा ते जिंकू शकत नाहीत. आता त्यांच्या जागांमध्ये घट निश्चित आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूच्या जागांमध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून जेडीयूमध्ये अस्वस्थता आहे.
मात्र भाजपासोबत असलेलं नातं तोडल्यापासून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच त्यासाठा आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांना देशातील अनेक राज्यांमध्ये पाठवून भाजपाविरोधी वातावरण बनवण्यासाठी आणि विविध नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ललन सिंह यांनी सुरुवात केली. तर त्यानंतर नितीश कुमार यांनी देशभरात दौरे करून भाजपाविरोधात मोठा गट तयार करण्याची मोर्चेबांधणी सुरू केली. आता २३ जून रोजी विरोधी ऐक्याला दिशा मिळण्याची शक्यता आहे.