नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 05:37 IST2025-07-23T05:37:38+5:302025-07-23T05:37:55+5:30
राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क; आरोग्याचे कारण विरोधकांना पटेना; लवकरच होणार निवडणूक

नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीकडे बहुमत उपलब्ध असल्याने त्यांना काळजीचे कारण नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांमार्फत होते. यामध्ये राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क असतो.
सर्व पात्र सदस्यांनी मतदान केल्यास विजयी होण्यासाठी ३९४ मतांची आवश्यकता आहे. लोकसभेत ५४२ सदस्यांमध्ये एनडीएला २९३ सदस्यांचे समर्थन आहे. राज्यसभेच्या २४० सदस्यसंख्येत एनडीएला १२९ सदस्यांचा पाठिंबा आहे, यामध्ये नामनिर्देशित सदस्यदेखील एनडीएच्या उमेदवाराला मतदान करतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. या आधारावर एनडीएकडे ७८६ पैकी ४२२ सदस्यांचे समर्थन असून, या बहुमतावर त्यांचा उमेदवार या निवडणुकीत सहज विजयी होईल.
नवे उपराष्ट्रपती कधी येणार?
धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींसाठी निवडणूक लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे. मृत्यू, राजीनामा, पदावरून हटविणे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे उपराष्ट्रपतिपद रिक्त झाल्यास त्यानंतर लवकरात लवकर नव्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक घ्यावी, असे संविधानाच्या कलम ६८(२)मध्ये म्हटले आहे. या निवडणुकीत निवडून आलेल्या व्यक्तीस पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो.
‘त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली’
जगदीप धनखड यांना विविध जबाबदाऱ्या पार पाडत देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, अशा शुभेच्छाही मोदी यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर धनखड यांच्याविषयी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये ही मते व्यक्त केली आहेत. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात धनखड यांनी म्हटले होते की, प्रकृतीची काळजी घेण्यास प्राधान्य देण्याकरिता व वैद्यकीय सल्ल्यानुसार मी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा संविधानाच्या कलम ६७ (अ)मधील तरतुदीनुसार देत आहे.