'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 18:25 IST2018-06-05T18:25:03+5:302018-06-05T18:25:03+5:30
प्रभू रामाची फसवणूक भाजपाला 2019 मध्ये महागात पडेल, असंही ते म्हणाले

'भाजपानं प्रभू रामचंद्रांची फसवणूक केली'
BJP has cheated Ram, winning 2019 elections will be difficult: Ayodhya priest
अयोध्या: भाजपानं प्रभू रामाची फसवणूक केली, असं विधान राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य एस. दास यांनी केलं आहे. भाजपा प्रभू रामाचं नाव घेऊन सत्तेत आली. मात्र त्यानंतर त्यांना रामाचा पूर्णपणे विसर पडला, असा आरोप दास यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केला.
'भाजपाला 2019 मधील लोकसभा निवडणूक जिंकायची असल्यास, त्यांनी आता राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी. अन्यथा आगामी निवडणूक जिंकणं भाजपाला जड जाईल,' असं आचार्य दास म्हणाले. काही तासांपूर्वीच चवानी मंदिराचे महंत परमहंस दास यांनी राम मंदिराचं बांधकाम तातडीनं सुरू न केल्यास भाजपाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख संत आचार्य दासदेखील या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत.
'त्यांना (भाजपाला) 2019 मध्ये सत्ता राखायची असल्यास, राम मंदिराची उभारणी करावी लागेल. अन्यथा आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू करुन त्यांचा पराभव होईल, याची काळजी घेऊ,' असा इशारा महंत परमहंस दास यांनी भाजपाला दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता राम मंदिर आणि हिंदुत्व हे मुद्दे भाजपाच्या अजेंड्यावर नाहीत, असं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं होतं. पुढील निवडणूक भाजपा विकासाच्या मुद्यावर लढवेल, असंही नक्वींनी म्हटलं होतं. त्याचे तीव्र पडसाद सध्या पाहायला मिळत आहेत.