BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:57 IST2025-10-14T17:55:22+5:302025-10-14T17:57:48+5:30
Bihar Election BJP Candidate list: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत भाजपने ७१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीने १० विद्यमान आमदारांना झटका दिला आहे.

BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
BJP Candidates For Bihar Assembly Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत १०१ जागा लढवत असलेल्या भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. पहिल्या यादीत ७१ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट भाजपने १० विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले असून, या १० पैकी ५ जण मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे या यादीने दुसऱ्या यादीतील इच्छुकांचेही धाबे दणाणले आहे.
भाजपने पहिली यादी जाहीर करताना १० आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. यात विधानसभेचे अध्यक्ष नंदकिशोर यादव, माजी मंत्री रामप्रीत पासवान, अमरेंद्र सिंह, रामसूरत राय यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.
बिहार निवडणूक २०२५ : भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे?
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा बिहार विधानसभा चुनाव-2025 के लिए चयनित सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं विजयश्री की अग्रिम शुभकामनाएं।#आएगी_NDApic.twitter.com/vENiqKpx1w
— BJP Bihar (@BJP4Bihar) October 14, 2025
विद्यमान आमदारांऐवजी नवे उमेदवार कोण?
भाजपने रीगा विधानसभा मतदारसंघातून मोतीलाल प्रसाद यांच्याऐवजी वैद्यनाथ प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. मुंगेरचे आमदार प्रणव कुमार यांचे तिकीट कापण्यात आले असून, तिथे कुमार प्रणय यांना उमेदवारी दिली गेली आहे.
सीतामढी विधानसभा मतदारसंघात मिथिलेश कुमार यांच्याऐवजी सुनील पिंटू कुमार भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत. भाजपमधून ते जदयूमध्ये गेले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत खासदार बनले. पण, २०२४ मध्ये त्यांना तिकीट मिळाले नाही. आता भाजपने त्यांना विधानसभेला संधी दिली आहे.
राजनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री रामप्रीत पासवान यांच्याऐवजी सुजीत पासवान यांना निवडणुकीचे तिकीट दिले आहे. नरपंतगंज मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयप्रकाश यादव यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी देवयंती यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
औराई विधानसभा मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री रामसूरत राय यांचा पत्ता कापला. त्यांच्याऐवजी रमा निषाद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राम निषाद या माजी खासदार अजय निषाद यांच्या पत्नी आहेत. कटोरिया मतदारसंघातून निक्की हेंब्रम यांचे तिकीट कापून पूरनलाल टुडू यांनी उमेदवार बनवण्यात आले आहे.
कुम्हरार मतदारसंघातही भाजपने विद्यमान आमदार अरुण सिन्हा यांचे तिकीट कापले असून, संजय गुप्ता निवडणूक लढवणार आहेत. अरुण सिन्हा हे मागील २० वर्षांपासून आमदार आहेत, त्यामुळे यावेळी तरुण चेहरा भाजपने दिला आहे.
पाटणा साहिब मतदारसंघातून भाजपने विद्यमान विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांना तिकीट नाकारले आहे. रत्नेश कुशवाह आता या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढणार आहे. नंदकिशोर यादव मागील ३० वर्षांपासून आमदार आहेत.
आरा मतदारसंघातही उमेदवार बदलण्यात आला असून, अमरेंद्र सिंह यांचे तिकीट कापून माजी आमदार संजय टायगर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरेंद्र सिंह हे मंत्रीही राहिलेले आहेत.