हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:46 IST2025-12-18T17:45:59+5:302025-12-18T17:46:42+5:30
No Confidence Motion In Haryana Assembly: काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, अविश्वास प्रस्तावासाठी दिलेली नोटिस विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.

हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
गतवर्षी झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाने विरोधकांना अनपेक्षित धक्का देत स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. मात्रा हरयाणामध्ये सरकार स्थापन करून वर्ष उलटत नाही तोच राज्यातील नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात सापडलं आहे. काँग्रेसने हरियाणा विधानसभेमध्ये सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून, अविश्वास प्रस्तावासाठी दिलेली नोटिस विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी विधानसभेमध्ये या प्रस्तावावर चर्चा होणार आहे.
काँग्रेसने राज्यातील विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. तसेच अविश्वास प्रस्ताव ठेवला आहे. याआधी काँग्रेसने अनेकदा राज्य सरकारवर तीव्र टीका केली होती. मात्र आता अधिकृतरीत्या विधानसभेत चर्चेसाठी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याने आता राज्याच्या राजकारणात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी या अविश्वास प्रस्तावावर विधानसभेत चर्चा होणार आहे. तसेच त्यानंतर त्यावर मतदान होईल. तसेच या मतदानामधून राज्य सरकारला बहुमत आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४८, काँग्रेसला ३७ आणि आयएनएलडीला २ तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सध्यातरी बहुमत सैनी सरकारच्या बाजूने असल्याचे दिसत आहे.