कर्नाटकमध्ये भाजपाला हरवलं, आता इतरही राज्यात पराभूत करू, न्यूयॉर्कमधून राहुल गांधींची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:36 IST2023-06-04T18:34:42+5:302023-06-04T18:36:59+5:30
Rahul Gandhi: कर्नाकट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता काँग्रेस पक्ष तेलंगाणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीमध्येही भाजपाला पराभूत करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकमध्ये भाजपाला हरवलं, आता इतरही राज्यात पराभूत करू, न्यूयॉर्कमधून राहुल गांधींची गर्जना
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला चारीमुंड्या चीत करत मिळवेल्या दणदणीत विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या देहबोलीतूनही त्याचा प्रत्यय येत आहे. दरम्यान, आज न्यूयॉर्कमधून राहुल गांधी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाकट विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता काँग्रेस पक्ष तेलंगाणा आणि इतर राज्यांतील निवडणुकीमध्येही भाजपाला पराभूत करू, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, केवळ काँग्रेस पक्षच नाही, तर भारतातील जनताही भाजपाच्या द्वेशाने भरलेल्या विचारसरणीला पराभूत करणार आहेत. आम्ही भाजपाला पराभूत करू शकतो कर्नाटकमध्ये दाखवून दिलं आहे. आम्ही त्यांना पराभूत केलेलं नाही तर त्यांचा सफाया केले आहे. आम्ही त्यांना कर्नाटकमध्ये चारीमुंड्या चीत केलं आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.
कर्नाटकमध्ये भाजपाने प्रत्येक डाव टाकून पाहिला. त्यांच्यासोबत संपूर्ण प्रसारमाध्यमे होती. आमच्याकडे जेवढा पैसा होता त्याच्या दहा पट पैसा त्यांच्याकडे होता. त्यांच्याकडे सर्व काही होते. तरीही आम्ही त्यांना पराभूत केले. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही आगामी तेलंगाणामध्ये होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाला पराभूत करणार आहोत. या निवडणुकीनंतर तेलंगाणामध्ये भाजपा शोधूनही सापडणार नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, केवळ काँग्रेस पक्षच नाही तर भारतातील लोक, मध्य प्रदेशमधील लोक, तेलंगाणामधील लोक, राजस्थान-छत्तीसगडमधील लोक भाजपाला पराभूत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. भाजपा समाजामध्ये ज्या प्रकारे द्वेष पसरवत आहे, त्यासोबत पुढे जाता येणार नाही हे लोकांना समजले आहे, असे राहुल गांधी म्हणाले.