भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:40 IST2025-12-26T15:39:56+5:302025-12-26T15:40:31+5:30
खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
केरळच्याराजकारणात भाजपने शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) एक नवा इतिहास रचला. भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. व्ही. राजेश यांची तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाली असून, केरळमध्ये भाजपचा महापौर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खरे तर, गेल्या ४५ वर्षांपासून या महापालिकेवर असलेल्या डाव्यांच्या (CPM) वर्चस्वाला जोरदार धक्का देत अथवा सुरुंग लावत भाजपने हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
असं आहे राजकीय गणित -
एकूण १०१ सदस्य असलेल्या या सभागृहात ४५ वर्षीय राजेश यांना ५१ मते मिळाली आहेत. एका अपक्ष नगरसेवकाने दिलेल्या पाठिंब्याने भाजपने बहुमताचा आकडा गाठला. तर विरोधात मैदानात असलेल्या सीपीआयएमच्या आर. पी. शिवाजी यांना २९, तर काँग्रेसप्रणित यूडीएफच्या के. एस. सबरीनाथन यांना १९ मते मिळाली. महत्वाचे म्हणजे, या महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ५० जागा जिंकत आपली शक्ती दाखवून दिली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर राजेश यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त करत, "आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊ आणि सर्व १०१ प्रभागांचा समान विकास करून तिरुवनंतपुरमला एका विकसित शहरात रूपांतरित करू," असे म्हटले आहे. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी या विजयाचे स्वागत करताना तिरुवनंतपुरमला देशातील पहिल्या तीन शहरांत स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला गेल्या अनेक निवडणुकांपासून संघर्ष करावा लागत आहे. भाजपला २०१६ मध्ये केवळ एक जागा मिळाली होती. ओ राजगोपाल यांनी २०१६ मध्ये नेमोम मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर, खासदार अभिनेता सुरेश गोपी यांनी २०२४ मध्ये त्रिशूरमधून विजय मिळवला होता. आता राज्याच्या राजधानीत सत्ता काबीज करणे हे भाजपसाठी केरळमधील शहरी राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. महत्वाचे म्हणजे, पुढील काही महिन्यांतच केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा विजय अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.