४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:05 IST2025-12-26T17:04:09+5:302025-12-26T17:05:48+5:30
शुक्रवारी सकाळी महापालिकेत महापौरपदाची निवड पार पडली. त्या भाजपाच्या उमेदवाराला ५१ मते मिळाली

४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
दक्षिणेकडील केरळ राज्यात भाजपाने इतिहास रचला आहे. याठिकाणी पहिल्यांदाच भाजपाचा महापौर बनला आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते वी.वी राजेश हे केरळची राजधानी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील पहिले भाजपा महापौर बनले आहेत. दक्षिणेच्या राजकीय इतिहासात ही घटना महत्त्वाची मानली जाते कारण आतापर्यंत या राज्यात भाजपाला कधी यश मिळाले नव्हते. महापौरपद घेताच वी.वी राजेश यांनी सगळ्यांना सोबत घेऊन सर्व वार्डाचा विकास करू आणि तिरुवनंतपुरमला एक विकसित शहर बनवू असा विश्वास व्यक्त केला.
शुक्रवारी सकाळी महापालिकेत महापौरपदाची निवड पार पडली. त्या भाजपाच्या उमेदवाराला ५१ मते मिळाली. त्यांना अपक्ष नगरसेवक एम राधाकृष्णन यांचे मत मिळाले तर दुसऱ्या अपक्षाने मतदानात भाग घेतला नाही. १०० सदस्यांच्या उपस्थितीत भाजपा उमेदवार राजेश यांना ५१ मते मिळाली तर त्यांच्याविरोधात उभे असणारे सीपीआयएमचे आर.पी शिवाजी यांना २९ आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील UDF चे उमेदवार के.एस सबरिनाथन यांना एकूण १९ मते मिळाली. भाजपाने डिसेंबरच्या सुरुवातीला तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या निवडणुकीत ५० जागा जिंकल्या होत्या.
केरळात भाजपाच्या विजयाची सुरुवात
राजेश महापौरपदी अशा वेळी विराजमान झालेत जेव्हा पुढील ६ महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला दीर्घ काळापासून संघर्ष करावा लागत आहे. याआधी पक्षाला केरळमध्ये कधी विजय मिळाला नाही. भाजपा २०१६ मध्ये फक्त एका जागेवर जिंकली होती. ओ राजगोपाल २०१६ मध्ये नेमोम मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर २०२४ मध्ये पक्षाचा एक खासदार अभिनेता सुरेश गोपी यांनी त्रिशूरमधून विजय मिळवला. आता वी.वी राजेश यांच्या महापौर बनण्याने केरळच्या शहरी राजकारणात भाजपाच्या विजयाची सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.
४५ वर्षाचा गड कोसळला
भाजपाचा हा विजय यासाठीही खास आहे कारण मागील ४५ वर्षापासून तिरुवनंतपुरम महापालिकेवर सीपीएमचा कब्जा होता. भाजपाने याठिकाणी सत्तापालट करून सीपीएमच्या या गडाला भगदाड पाडले आहे त्याशिवाय दक्षिणेकडील राज्यात भाजपाची पकड आणखी मजबूत केली आहे. सीपीएम आणि काँग्रेसने मिळून शहराला मागे ढकलले. महापालिकेला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवले होते. मागील अनेक वर्ष ड्रेनेज, पाणी आणि कचरा नियोजन यासारख्या सुविधाही लोकांना दिल्या नाहीत असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी केला. आज आमच्या कामाची सुरुवात झाली आहे. तिरुवनंतपुरमला देशातील प्रमुख ३ शहरांपैकी एक बनवणे आमचे काम आहे असं भाजपा महापौरांनी सांगितले.