राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:52 IST2025-10-25T19:49:56+5:302025-10-25T19:52:25+5:30
भाजपाला ७ मते भेट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जर असे झाले असते तर आमच्या उमेदवाराला २१ मते कशी मिळाली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
जम्मू काश्मीरमध्ये शुक्रवारी राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक पार पडली. यावेळी ३ जागांवर नॅशनल कॉन्फरन्स तर एका जागेवर भाजपाने विजय मिळवला. कमी आमदार असतानाही भाजपाला अधिकची मते मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. त्यातच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपाने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि चौथ्या जागेसाठी डील ऑफर केली होती असं त्यांनी सांगितले.
फारूख अब्दुल्ला यांनी राज्यसभेतील ३ जागा विजयी झाल्यानंतर आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या पक्षाचे सर्व आमदार एकजूट राहिले त्यातून पक्षाला विजय मिळाला त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे. एकाही आमदाराला हे फोडू शकले नाहीत. काँग्रेससह इतरांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचे आभारी आहोत. मी मेहबूबा यांच्या पक्षाची, काँग्रेस आणि इतर अपक्ष आमदारांना आमच्यासोबत उभे राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो असं त्यांनी सांगितले.
BJP ने निवडणूक न लढण्यासाठी दिली होती ऑफर
राज्यसभा निवडणुकीत चौथ्या जागी उमेदवार न देण्याची विनंती भाजपाने आम्हाला केली होती. त्यांनी दिलेला प्रस्ताव आम्ही स्वीकारला नाही. भाजपाने आमच्याशी संपर्क साधला होता. राज्यसभेतील चौथ्या जागेसाठी डील ऑफर केली होती. तुम्ही ३ जागा ठेवा, चौथ्या जागेसाठी निवडणूक लढू नका असं भाजपाने म्हटले परंतु आम्ही त्यांना स्पष्ट नकार देत आमचा पक्ष मैदानात उतरेल आणि तिथेच याचा फैसला होईल असं सांगितले होते असंही फारूख अब्दुल्ला यांनी पत्रकारांना सांगितले.
#WATCH | Srinagar, J&K | On National Conference winning three Rajya Sabha seats from Jammu & Kashmir, JKNC Chief Farooq Abdullah says, "I am grateful that all MLAs of our party stayed united and our party achieved success... Other parties, including Congress, supported us... We… pic.twitter.com/kfmAAPeSgz
— ANI (@ANI) October 25, 2025
दरम्यान, आम्ही चौथी जागा जिंकू शकलो असतो परंतु काही अपुऱ्या आश्वासनामुळे ते होऊ शकले नाही याची खंत आहे. आम्ही यामुळे निराश आहोत. परंतु निवडणुकीत अशा गोष्टी होत असतात. आम्ही ३ जागा जिंकण्यास यशस्वी ठरलो असंही फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं. त्याशिवाय पीपुल्स कॉन्फरन्सचे प्रमुख आमदार सज्जाद लोन यांच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. भाजपाला ७ मते भेट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जर असे झाले असते तर आमच्या उमेदवाराला २१ मते कशी मिळाली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.