भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:56 IST2025-11-10T13:48:20+5:302025-11-10T13:56:04+5:30
गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात

भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
नवी दिल्ली - नुकतेच गुजरात एटीएसनं ISIS शी निगडित एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. ज्यात 'रिसिन' नावाचं रासायनिक विषाचा वापर करण्याचं षडयंत्र होते. हे विष एरंडीच्या बियांपासून तयार केलेले असते. जे घराघरात सहजपणे मिळते. परंतु हे किती धोकादायक आहे? याच्या अगदी थोड्या प्रमाणातही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
रिसिन म्हणजे काय?
रिसिन हे एरंडेल वनस्पतीच्या (रिसिनस कम्युनिस) बियांमध्ये आढळणारे एक प्रथिन आहे. ही वनस्पती जगभरात प्रामुख्याने तेल काढण्यासाठी लागवड केली जाते. एरंडेल तेल औषधे, साबण आणि यंत्रसामग्रीमध्ये वापरले जाते. मात्र या बियांमध्ये रिसिन नावाचे विष असते, जे इतके शक्तिशाली आहे की ते जैविक शस्त्र मानले जाते. अमेरिका आणि रशिया सारख्या देशांनी एकेकाळी ते शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार केला होता.
रिसिन ही एक पांढरी, गंधहीन आणि चवहीन पावडर आहे. ती खाल्ल्याने, श्वास घेताना किंवा इंजेक्शनने शरीरात टाकली जाऊ शकते. सुदैवाने ती संसर्गजन्य नाही - ती एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. हवेत सोडल्यास किंवा पाण्यात मिसळल्यास ती व्यापक नुकसान करू शकते. एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर उरलेल्या कचऱ्यांतून हे भयंकर विष तयार केले जाते. हे विष पोटात गेले तर श्वासोच्छ्वासास त्रास, घशावर सूज येते. इंजेक्शनच्या माध्यमातून ते शरीरात गेले तर शारीरिक क्रियांवर गंभीर परिणाम होऊन ते अत्यंत घातक ठरते.
रिसिन कसे बनवले जाते?
एरंडीच्या बियाण्यांमधून तेल काढल्यानंतर उरणारा कचरा, ज्याला "एरंडेल केक" म्हणतात, हा रिसिनचा मुख्य स्रोत आहे. दरवर्षी जगभरात २० लाख टनांहून अधिक एरंडेल बियाण्यांवर प्रक्रिया केली जाते. या कचऱ्यापैकी ५% रिसिन असते. बियाणे कुस्करले जातात आणि गरम पाणी किंवा रसायनांचा वापर करून तेल वेगळे केले जाते. उर्वरित लगदा रिसिनने भरलेला असतो. रिसिन घरी बनवणे देखील सोपे आहे मात्र ही प्रक्रिया धोकादायक आहे. विषाचा एक छोटासा भाग देखील हवेत जाऊ शकतो आणि आजार निर्माण करू शकतो.
गुजरात प्रकरणातील आरोपी डॉक्टरने ४ लिटर एरंडेल तेल खरेदी केले आणि कचऱ्यापासून रिसिन बनवण्याचा प्रयत्न केला. हे विष बनवणे कठीण नाही, परंतु ते ओळखणे आणि प्रतिबंध करणे आवश्यक आहे असं तज्ज्ञ सांगतात. रिसिन जगातील सर्वात घातक विषापैकी एक आहे. हे शरीरातील आतून पेशी नष्ट करते. यावर कोणताही इलाज किंवा उतारा नाही, फक्त लक्षणांवर उपचार केले जाऊ शकतात. २०२२ मध्ये बेल्झियममध्ये एका महिलेने केस गळती रोखण्यासाठी ६ बिया खाल्ल्या, त्यातून तिला खूप वेदना, उलटी झाली परंतु वेळीच उपचार केल्याने ती वाचली. भारतात या वनस्पतीची शेतीही होते, त्याचा कचराही सहज मिळतो. त्यामुळे दहशतवाद्यांनी याचा वापर करणे पसंत केले. गुजरातच्या डॉक्टरने शहरांमध्ये हल्ला करण्याची योजना बनवली होती. मोठ्या प्रमाणात रिसिन हवेत सोडले असते तर असंख्य मनुष्यांना त्याचा त्रास झाला असता.