मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 09:13 IST2025-10-31T09:13:07+5:302025-10-31T09:13:36+5:30
Bijnor Temple, Free Liquor Announcement: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये शिवमंदिराच्या लाऊडस्पीकरवरून गावकऱ्यांसाठी एक तास 'मदिरा दान' (फ्री दारू) वाटपाची घोषणा करण्यात आली. या घोषणेमुळे मोठा वाद; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश.

मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
बिजनौर : धार्मिक स्थळाचा वापर सार्वजनिक घोषणांसाठी होत असताना, उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शिवमंदिरातून गावकऱ्यांना एक तास 'फ्री दारू' वाटप करण्याची घोषणा करण्यात आल्याने मोठा गदारोळ उडाला आहे.
नजीबाबाद परिसरातील आलमपूरगंगा उर्फ गंगावाला टांकली या ग्रामपंचायतीतील शिवमंदिराच्या लाऊडस्पीकरवरून बुधवारी संध्याकाळी एक घोषणा करण्यात आली. या घोषणेमध्ये, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत छितावर गावातील देशी दारूचा ठेका केवळ गावकऱ्यांसाठी 'फ्री' असेल, असे सांगण्यात आले. म्हणजेच, या वेळेत कोणताही ग्रामीण दारूच्या ठेक्यावरून पैसे न देता दारू घेऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध?
स्थानिक नागरिक या घोषणेचा संबंध आगामी ग्रामपंचायत निवडणुकीशी जोडत आहेत. निवडणुकीची घोषणा झालेली नसतानाही, इच्छुक उमेदवार गावांमध्ये आतापासूनच मेजवान्यांचे आयोजन करत असल्याची चर्चा आहे. दारू वाटपाची ही घोषणा याच प्रयत्नांचा भाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
ही घोषणा कोणी केली?
एका गावकऱ्याच्या सांगण्यावरून ही घोषणा करण्यात आली होती, असे मंदिराचे सेवादार धर्मवीर सिंह यांनी सांगितले. आता पुजारी धर्मवीर सिंह यांनी माफीनामा लिहून दिला असल्याचे पोलीस अधिकारी पुष्पा देवी यांनी सांगितले आहे.
प्रशासनाने घेतले गंभीर दखल
नजीबाबादचे एसडीएम शैलेंद्र कुमार सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "मंदिरातून फ्री दारू वाटपाची घोषणा करणे हा धार्मिक भावनांशी खेळ आहे," असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.