नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 08:44 IST2025-08-05T08:44:01+5:302025-08-05T08:44:28+5:30
यामुळे बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळेल...

नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी सरकारी शिक्षकांच्या भरतीमध्ये ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर केल्याची मोठी घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या लोकांसाठी किती टक्के भरती राखीव ठेवली जाईल हे स्पष्ट केले नाही. यावर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळेल.
नितीश कुमार म्हणाले की, शिक्षकांच्या भरतीत बिहारमधील रहिवाशांना (डोमिसाइल) प्राधान्य देण्यासाठी संबंधित नियमात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी होणाऱ्या शिक्षक भरती परीक्षेपासूनच हे धोरण लागू केले जाईल. त्याच वेळी, २०२६ मध्ये टीआरई-५ घेण्यात येईल.
महिलांचा कोटा वाढवला
बिहारमध्ये ‘डोमिसाइल पॉलिसी’वरून वाढत्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, बिहार मंत्रिमंडळाने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३५ टक्के कोटा फक्त राज्यातील ‘कायमस्वरूपी रहिवाशांसाठी’ मर्यादित ठेवण्याचा आदेश दिला आहे. २०१६ मध्ये, बिहार सरकारने राज्यातील सर्व स्तरांवर सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचा कोटा वाढवला होता.