Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:14 IST2025-11-18T14:09:54+5:302025-11-18T14:14:02+5:30
Bihar Swearing in Ceremony: बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी पाहता गांधी मैदानात जय्यत तयारी सुरू आहे.

Bihar: शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी, पाटण्यातील गांधी मैदानात रोषणाई, थेट बंगळुरूहून मागवली फुले
एस. पी. सिन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा: २० नोव्हेंबरला बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी पाहता गांधी मैदानात जय्यत तयारी सुरू असून शेकडो मजूर या तयारीत भिडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह तसेच देशभरातून येणारे मुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपींच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थेसाठी यंत्रणा युद्धपातळीवर तयारी करीत आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांनाही निमंत्रणे पाठविण्यात आली असून गुरुवारी नितीशकुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी गांधी मैदानावर रोषणाई व सजावटीचे काम सुरू आहे.
दरम्यान, राजदच्या नवनिर्वाचित आमदारांनी सोमवारी एकमताने तेजस्वी यादव यांची त्यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. राजदचे प्रवक्ते शक्ती सिंह म्हणाले, "नवनिर्वाचित आमदारांनी तेजस्वी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली."
जर्मन हँगर आणि कारपेट
शपथविधी सोहळ्यासाठी भव्य जर्मन हँगर अर्थात आधुनिक मंडप उभारण्यात येत असून याची क्षमता ४० हजार लोकांची असेल. शिवाय, भव्य कारपेट मंडपाची शोभा वाढवेल. सोहळ्यासाठी ३० हजार खुर्च्या आणि व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी १५००हून अधिक सोफासेट असतील.
अशी आहे तयारी
- १०० ते १५० मजूर अहोरात्र मैदानावर काम करीत आहेत.
- व्यासपीठाच्या सजावटीसाठी बंगळुरूहून फुले मागवली.
- पालिकेच्या गाड्या मैदानात पाण्याचे फवारे मारत आहेत.
- जागोजाग सीसीटीव्ही असून त्यांची तपासणी सुरू आहे.