"ए मनोरमा, बता ना यार..."; नितीश कुमारांच्या महिला आमदाराला हिंदीही वाचता येईना, शपथ घेतानाच गोंधळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:19 IST2025-12-01T17:03:41+5:302025-12-01T17:19:32+5:30
बिहारमधील महिला आमदाराला हिंदीतून शपथ वाचता येत नसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"ए मनोरमा, बता ना यार..."; नितीश कुमारांच्या महिला आमदाराला हिंदीही वाचता येईना, शपथ घेतानाच गोंधळल्या
Bihar Assembly: बिहारच्या १८ व्या विधानसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. प्रोटेम स्पीकर नरेंद्र नारायण यादव यांच्यासमोर सर्व आमदारांनी शपथ घेतली. शपथविधी समारंभात नवादा येथील जेडीयू आमदार आणि बाहुबली राजबल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांच्या शपथग्रहणाने सर्वाधिक लक्ष वेधले. पहिल्यांदाच आमदार म्हणून सभागृहात आलेल्या विभा देवी शपथपत्र वाचताना वारंवार अडखळत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव दिसत होता. त्या शपथ पत्रातील वाक्ये नीट बोलूही शकत नव्हत्या. त्या अनेक वेळा थांबत असल्याने सभागृहात काही क्षण शांतता पसरली होती. त्यांची ही अडचण पाहून त्यांच्या बाजूला बसलेल्या सहकारी आमदार मनोरमा देवी यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला आणि हळू आवाजात त्यांच्या कानात योग्य शब्द सांगितले. मनोरमा देवींच्या मदतीने विभा देवी तुटक शब्दांत का होईना, पण आपली शपथ पूर्ण करू शकल्या.
विभा देवींना हिंदीची एकही ओळ वाचता येत नव्हती. त्या अडखळत राहिल्या आणि ओळी विसरत राहिल्या. मग त्यांनी जवळ बसलेल्या मनोरमा देवींना, "अरे मनोरमा, मला सांग ना, यार" असं म्हटलं. त्यानंतर मनोरमा देवी सांगायला लागल्या मग विभा देवी तिच्या मागे पुन्हा बोलत होत्या. संपूर्ण सभागृह हा सर्व प्रकार पाहत होता. विभा देवींच्या या अडखळण्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकाही झाली. काही युझर्सनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून प्रश्न उपस्थित केले. राजकारणातील एका कुटुंबातून आलेल्या नवीन लोकप्रतिनिधीसाठी स्वतःची ओळख निर्माण करणे किती आव्हानात्मक असते, हेही या घटनेतून दिसून आले.
बधाई हो बिहार— ये हैं नवादा की विधायक विभा देवी..
— Ahmad Raza (@ahmadrazarjd) December 1, 2025
ठीक से, शपथ नहीं पढ़ पायी। बगल में बैठी अपनी साथी विधायक मनोरमा देवी से कहीं, पढ़ न छुटकी। बता ना । अपनी छुटकी के सपोर्ट से ठेढ़ा-बोकला शपथ पूरा किया!
आपको बाहुबल,परिवारवाद,भौकाल चाहिए तो लीजिए। pic.twitter.com/bezGFm64KY
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या बाबतीतही शपथ वाचताना एक छोटीशी चूक झाली. रेणू देवी यांनी शपथ चुकीच्या पद्धतीने वाचल्याचे प्रोटेम स्पीकर नरेंद्र नारायण यादव यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित त्यांना थांबवले आणि योग्य पद्धतीने शपथ पुन्हा घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रेणू देवींनी पुन्हा एकदा शपथ घेतली.