अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:28 IST2026-01-14T16:26:48+5:302026-01-14T16:28:44+5:30
किती अशेल या मंदिराची उंची? काय असेल खास? जाणून घ्या...

अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
Bihar Ramayan Temple: बिहारचा पूर्व चंपारण जिल्हा सध्या चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे, या ठिकाणी विराट रामायण मंदिर बांधले जात आहे. हे मंदिर १२० एकरवर बांधले जाणारे जगातील सर्वात उंच मंदिर असल्याचा दावा केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ण झाल्यावर मंदिराचे शिखर तब्बल 270 फूट उंच असेल. ही उंची अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि दिल्लीतील कुतुब मिनारपेक्षाही जास्त आहे.
१२० एकरांचा भव्य परिसर
सुमारे १२० एकर क्षेत्रात पसरलेले विराट रामायण मंदिर स्थापत्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या उल्लेखनीय असेल. मंदिराचे मुख्य शिखर २७० फूट उंच असेल. याशिवय, मंदिर संकुलात १९८, १८०, १३५ आणि १०८ फूट उंचीची इतर शिखरेदेखील असतील. उंचीसोबतच, मंदिराची लांबी १०८० फूट आणि रुंदी ५४० असेल. या भव्य आकारामुळे हे देशातील सर्वात मोठ्या धार्मिक संकुलांपैकी एक असेल.
१७ जानेवारी रोजी शिवलिंगाची स्थापना
येत्या १७ जानेवारी रोजी या मंदिरात जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची स्थापना केली जाणार असून, यासाठी एक भव्य समारंभ आयोजित केला जाईल. देशभरातील साधू-संतांसह हजारो भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या भव्य रामायम मंदिराची तुलना केल्यास, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखराची उंची १६१ फूट, तर कुतुबमिनारची अंदाजे २३८ फूट आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर
अयोध्येतील श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. सुमारे २.७ एकर क्षेत्रात पसरलेल्या या भव्य मंदिराची एकूण उंची १६१ फूट आहे, ज्यामध्ये शिखराचा समावेश आहे. हे मंदिर ३६० फूट लांब आणि २३५ फूट रुंद आहे, ज्याचे एकूण बांधलेले क्षेत्रफळ अंदाजे ५७,४०० चौरस फूट आहे. या तीन मजली मंदिरात एकूण ३६६ खांब, पाच मंडप आणि १२ भव्य प्रवेशद्वार आहेत. नागर शैलीत बांधलेले हे मंदिर आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन वास्तुकलेचे उल्लेखनीय मिश्रण आहे.
कुतुबमिनार
दिल्लीच्या मेहरौली परिसरात स्थित कुतुबमिनार हे भारतातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. दिल्ली सल्तनतचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक याने १,१९९ मध्ये त्याचे बांधकाम सुरू केले आणि नंतर ते इल्तुतमिशच्या काळात पूर्ण झाले. हा विटांचा मनोरा ७२.५ मीटर (अंदाजे २३८ फूट) उंच असून, जगातील सर्वात उंच विटांचा मनोरा मानला जातो.