बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 18:01 IST2024-01-25T17:47:18+5:302024-01-25T18:01:52+5:30
नितीश कुमार यांनी बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय जेडीयू आमदारांना सांगितला असल्याचे समजते.

बिहारचं सत्तानाट्य अंतिम टप्प्यात; बड्या भाजप नेत्यांना दिल्लीतून बोलावणं, नितीश कुमारांचंही अखेर ठरलं!
Bihar Politics ( Marathi News ) :बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत जाण्याची तयारी केली असून याबाबतचा निर्णय त्यांनी जेडीयू आमदारांच्या आज झालेल्या बैठकीत जाहीर केल्याचे समजते. तर दुसरीकडे, भाजपच्याही गोटात प्रचंड हालचाली वाढल्या असून बिहार भाजपमधील अनेक बड्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांत पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात भूकंपाचे हादरे बसणार असून सत्ताबदल होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.
नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांची नुकतीच बैठक घेतली आहे. या बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबतचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नसला तरी बैठकीत पक्षाची पुढील राजकीय दिशा स्पष्ट करत नितीश कुमार यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा आपला निर्णय जेडीयू आमदारांना सांगितला असल्याचे समजते. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणाही होण्याची शक्यता आहे.
लालू प्रसाद यादवही झाले सक्रिय
नितीश कुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडून एनडीएसोबत जाऊ नये, यासाठी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव सक्रिय झाले असून त्यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. तसंच काँग्रेस नेत्यांकडूनही नितीश कुमारांशी संपर्क साधला जात आहे.
भाजपच्या गोटातही हालचालींना वेग
बिहारमध्ये सत्ताबदल होण्याची शक्यता असताना भाजपने आपल्या सर्व आमदारांना राजधानी पाटण्यात थांबण्यास सांगितलं आहे. तसंच बिहारमधील भाजपच्या काही नेत्यांना दिल्लीतही बोलावण्यात आल्याची माहिती आहे. राज्य भाजपच्या नेत्यांना विश्वासात घेत पुन्हा एकदा नितीश कुमारांना एनडीएत प्रवेश दिला जाणार आहे.