प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 19:23 IST2025-05-19T19:22:50+5:302025-05-19T19:23:13+5:30
Bihar Politics: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
Bihar Politics: बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या 'जन सूरज' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली आहे. माजी खासदार उदय सिंग उर्फ पप्पू सिंग यांना पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले आहे. कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकमताने उदय सिंह यांची निवड केली आहे. नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल, प्रशांत किशोर यांनी जन सूरज परिवाराच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, जन सूरज जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल.
उदय सिंह यांनी प्रशांत किशोर यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. उदय सिंह यांनी सांगितले की, प्रशांत किशोर हे जन सूरजचे सूत्रधार आहेत. राजकारणातील त्यांच्या दीर्घकाळाच्या सहभागाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या समर्पणाचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. प्रशांत किशोर यांच्या बैठकांमध्ये बिहारच्या कल्याणासाठी होणाऱ्या बदलांवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
जन सुराज अभियानाने बिहारमधील लोकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. जन सूरज मोहिमेच्या कल्पनेने लोकांमध्ये आकर्षण निर्माण केले. जनसुरज पक्षाची स्थापना जनतेच्या मागणीवरून करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.
आरसीपी सिंह जन सूराजमध्ये सामील
नुकतेच माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सेनापती असलेल्या आरसीपी सिंह यांनी जन सूरजमध्ये पक्षप्रवेश केला आहे. आरसीपी सिंह जन सूरजमध्ये सामील झाल्यानंतर बिहारमधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. आता बिहारच्या राजकारणात जनसुरजला तिसरा पर्याय बनवण्याचे आव्हान उदय सिंह यांच्यासमोर असेल.