Bihar Politics: भाजपपासून 'फारकत' घेतल्यानंतर, नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:12 IST2022-08-09T16:11:27+5:302022-08-09T16:12:11+5:30
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपवर जेडीयू संपवण्यासाठी कट रचण्याचा आरोप केला आहे....

Bihar Politics: भाजपपासून 'फारकत' घेतल्यानंतर, नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया, केला मोठा आरोप
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षासोबतची (BJP) युती तुटल्यानंतर, जनता दल (यू)चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर जेडीयू संपवण्याचा कट रचण्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर भाजपने नेहमीच अपमानित केले, असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ते जेडीयू आमदारांच्या बैठकीत बोलत होते.
बैठकीत नितीश कुमार म्हणाले, भाजपने नेहमीच अपमानित केले. जेडीयू संपवण्याचा कट रचण्यात आला. एवढेच नाही, तर भाजपने आपले आमदार खरेदी करण्याचीही तयारी केली होती, असेही धक्कादायक विधान नितीश कुमार यांनी केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत अनेक आमदार CM नितीश कुमार यांच्यासोबत बोलताना म्हणाले, की सध्याची युती 2020 पासूनच आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. चिराग पासवान यांचे नाव न घेता ते म्हणाले, की ते एक असेच उदाहरण होते. तसेच, जर आता ते सावध झाले नाही, तर हे पक्षाच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या काही काळापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद सुरू होते. नितीश कुमार भाजपची साथ सोडणार अशी चर्चा होती, ती चर्चा आज अखेर खरी ठरली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. आता सीएम नितीश कुमार आरजेडी, डावे आणि काँग्रेस या महाआघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहेत.
बिहारमध्ये 'ऑपरेशन रिव्हर्स लोटस'
भाजप आणि जदयुची युती तुटल्यानंतर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी ट्विटरवरुन भाजपवर निशाणा साधला. बिहारमध्ये सध्या ऑपरेशन रिव्हर्स लोटस सुरू आहे,अशी टीका त्यांनी केली. याशिवाय, लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्या यांनीदेखील, 'राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं लालटेनधारी', अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.