Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:06 IST2025-11-16T13:03:55+5:302025-11-16T13:06:42+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार मुसंडी मारली.

Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षांच्या महाआघाडीला चारी मुंड्या चीत केले. एनडीएने केवळ तीन-चतुर्थांश जागा जिंकल्या नाही तर या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या जवळपास सर्व मंत्र्यांना पुन्हा निवडून आणण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे.
या निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाने आपल्या २५ मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. केवळ जेडीयूच्या एका मंत्र्याचा अपवाद वगळता सर्व २४ मंत्री निवडून आले आहेत. भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा हे दोघे अनुक्रमे तारापूर व लखीसराय या मतदारसंघांतून विजयी झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. भाजपने आपल्या १५ मंत्र्यांना पुन्हा विधानसभेचे तिकीट दिले होते. हे मंत्री पुन्हा विजयी झाले आहेत.
भाजपचे अनुभवी नेते व कृषिमंत्री प्रेम कुमार हे सलग आठव्यांदा गया टाऊन या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी जेडीयूचे कॅबिनेटमधील सहकारी बिजेंद्र यादव (सुपौल) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मंत्री संजय सरावगी व नितीन नबीन हे दोघे अनुक्रमे दरभंगा व बंकीपूर या मतदारसंघांतून सलग पाचवेळा विजयी झाले आहेत.
बिहारच्या नवीन सरकारसोबत काम करण्यास इच्छुक : चिराग पासवान
- बिहारमधील नवीन सरकारमध्ये सहभागी होण्यास लोक जनशक्ती पक्ष(रामविलास) इच्छुक असल्याचे शनिवारी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी स्पष्ट केले. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदी राहावे, ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
- राज्यात एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल नितीश कुमार यांचे लोजप (रामविलास)च्या प्रतिनिधी मंडळाने अभिनंदन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पासवान यांनी संबंधित विधान केले. त्यावेळी नवीन सरकार स्थापनेसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे पासवान म्हणाले. यावेळी पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे.
- त्यामुळे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहोत, असेही पासवान म्हणाले. मी नितीश कुमार यांचा कट्टर विरोधक आहे, हा विरोधकांनी केलेला खोटा प्रचार असल्याचा दावा करत पासवान यांनी राजदला लक्ष्य केले.