Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 08:16 IST2025-11-18T08:14:31+5:302025-11-18T08:16:00+5:30
Bihar NDA Government Formation: बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होत आहे.

Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
विभाष झा
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणा : बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा शपथविधी गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी पाटण्यातील भव्य गांधी मैदानात होत आहे. नव्या मंत्रीमंडळात सहा आमदारांमागे एक मंत्री असे सूत्र ठेवण्यात आले आहे. राजद विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली आहे.
राजीनामा देत सरकार स्थापनेचा केला दावा
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मावळत्या सरकारच्या मंत्रीमंडळाची अंतिम बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरींसह बहुतांश मंत्री उपस्थित होते. यानंतर नितीशकुमार यांनी राजभवनात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची भेट घेत राजीनाम्यासोबतच नवे सरकार स्थापन करण्याचा दावा केला. नव्या सरकारच्या स्थापनेपर्यंत नितीशकुमार हेच काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील.
कोणत्या पक्षाचे किती मंत्री?
| पक्ष | मंत्र्यांची संख्या |
| भाजप | १५ |
| जदयू | १४ |
| लोजपा | ३ |
| हम | १ |
| रालोसपा | १ |
| एकूण | ३४ |
पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्र तसेच इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या दृष्टीने जोरदार तयारी सुरू झाली आहे. सोहळ्याची निमंत्रणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एनडीए घटक पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली आहेत. यात उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, आसाम इत्यादी राज्यांचा समावेश आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील.