बिहारमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 08:32 IST2026-02-07T08:31:45+5:302026-02-07T08:32:06+5:30
बिहारमध्ये बऱ्याच संघर्षानंतर पाटणा पोलिसांनी खासदार पप्पू यादव यांना अटक केली.

बिहारमध्ये मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा! पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात अटक
Pappu Yadav Arrested:बिहारच्या राजकारणात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. तब्बल ३१ वर्षे जुन्या एका घर बळकावल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, अटकेपूर्वी खासदार आणि पोलीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
नेमके प्रकरण काय?
हे प्रकरण १९९५ मधील आहे. तक्रारदार विनोद बिहारी लाल यांनी आरोप केला होता की, पप्पू यादव यांनी फसवणूक करून त्यांचे घर भाड्याने घेतले आणि नंतर तिथे स्वतःचे कार्यालय थाटून घरावर बेकायदेशीर कब्जा केला. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना वारंवार समन्स बजावले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांच्या मालमत्तेवर जप्ती (कुर्की) आणण्याचे आदेश दिले होते. अखेर जामीन रद्द झाल्याने आणि वॉरंट निघाल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
'माझी हत्या करण्याचा कट'; पप्पू यादव यांचे गंभीर आरोप
पप्पू यादव यांनी बिहार सरकार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावर घणाघाती आरोप केले. "नीटच्या विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी लढत आहे, म्हणून सम्राट चौधरी मला धमकावत आहेत. साध्या गणवेशातील पोलीस माझ्या घरात घुसले, मला वाटले माझी हत्या करण्यासाठीच कुणीतरी आले आहे. मला फासावर चढवा, पण मी झुकणार नाही." त्यांनी पुढे सवाल केला की, "रुपेश हत्या प्रकरणात न्याय मिळाला का? गुन्हेगार मोकाट आहेत आणि पोलीस एका खासदाराला अटक करायला पाच पोलीस ठाण्यांची फौज घेऊन येतात. मी काय दहशतवादी आहे का?"
पोलीस आणि समर्थकांमध्ये जुंपली
पाटणा सिटी पोलीस अधिक्षक भानु प्रताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक मध्यरात्री १२ च्या सुमारास पप्पू यादव यांच्या निवासस्थानी पोहोचले. पप्पू यादव यांनी रात्री अटक करण्यास विरोध केला आणि पोलिसांकडे वॉरंटची मागणी केली. पोलीस कुर्कीचे आदेश घेऊन आले आहेत की अटकेचे यावरून बराच वेळ वाद सुरू होता.
अटकेची बातमी समजताच समर्थकांनी घराबाहेर गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरू केली. पोलीस निरीक्षक दीपक आणि समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
दरम्यान, पप्पू यादव यांना शुक्रवारी रात्री पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. ३१ वर्षांनंतर या प्रकरणाला मिळालेल्या वळणामुळे बिहारच्या राजकारणात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.