बिहारमध्ये 'काँटे की टक्कर'; दोन्ही बाजूचे अनेक आमदार गायब, कोण बाजी मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:05 PM2024-02-12T13:05:41+5:302024-02-12T13:08:31+5:30

आरजेडीचे दोन आमदारही सत्ताधारी गोटात दाखल झाल्याने तेजस्वी यादव यांना मोठा धक्का बसला आहे.

Bihar Many MLAs on both sides are missing Nitish Kumar Vs Tejaswi Yadav latest updates | बिहारमध्ये 'काँटे की टक्कर'; दोन्ही बाजूचे अनेक आमदार गायब, कोण बाजी मारणार?

बिहारमध्ये 'काँटे की टक्कर'; दोन्ही बाजूचे अनेक आमदार गायब, कोण बाजी मारणार?

Nitish Kumar Vs Tejaswi Yadav ( Marathi News ) : जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश  कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. विधानसभेत बहुमत चाचणीआधी विधानसभा अध्यक्षांना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदार गायब असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूचे सहा आमदार पक्षाच्या संपर्कात नव्हते. मात्र यातील तीन आमदारांना परत आणण्यात आम्हाला यश मिळाल्याचा दावा, जेडीयूकडून करण्यात आला आहे.

नितीश कुमार यांच्यासोबत युतीत असलेल्या भाजप आणि जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्नही आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्याकडून सुरू होता. त्यातच भाजपचेही सध्या तीन आमदार गायब आहेत. यामध्ये मिश्रीलाल यादव, भागीरथी आणि रश्मी वर्मा यांचा समावेश आहे. 

आरजेडीचे दोन आमदार सत्ताधारी पक्षासोबत!

तेजस्वी यादव यांच्याकडून सत्ताधारी पक्षातील आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असतानाच आरजेडीचे दोन आमदारही सत्ताधारी गोटात दाखल झाल्याने यादव यांना मोठा धक्का बसला आहे. चेतन आनंद आणि नीलम देवी हे आरजेडीचे दोन्ही आमदार आज सत्ताधारी बाकांवर बसले. मात्र त्यांना जबरदस्तीने तिथं बसवण्यात आल्याचा आरोप आरजेडीकडून करण्यात आला आहे.

नितीश कुमारांना मिळाला महत्त्वाचा दिलासा

आमदार गायब असल्याची चर्चा सुरू असतानाच काल रात्री हम पक्षाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांचाही फोन बंद होता. त्यामुळे मांझी हे तेजस्वी यादव यांच्या संपर्कात आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आज सकाळी केंद्रीय मत्री नित्यानंद राय यांच्यासोबत ते विधीमंडळात पोहोचल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावात कोण बाजी मारतं, यावरच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं भवितव्य ठरणार आहे.

Web Title: Bihar Many MLAs on both sides are missing Nitish Kumar Vs Tejaswi Yadav latest updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.