अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:44 IST2025-07-30T08:41:53+5:302025-07-30T08:44:38+5:30
शाळेत शिकत असताना वर्गात झोपलेल्या मुलाला शाळेमध्ये सोडून मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी शाळेला कुलूप लावून घरी गेले.

अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील ताजगंज फसिया येथील प्राथमिक शाळेत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत शिकत असताना वर्गात झोपलेल्या मुलाला शाळेमध्ये सोडून मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचारी शाळेला कुलूप लावून घरी गेले. मुलाला जाग आल्यावर तो घाबरून ओरडत राहिला, रडला आणि खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात लोखंडी ग्रिलमध्ये अडकला.
कटिहार महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या ताजगंज फासिया प्राथमिक शाळेत ही घटना घडली. शाळेत शिकण्यासाठी आलेल्या एका मुलाला वर्गात गाढ झोप लागली. शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद छोटू आणि इतर कर्मचाऱ्यांनी शाळेचं मुख्य गेट बंद केलं आणि सर्व मुलं सुरक्षित बाहेर आली आहेत की नाही हे तपासल्याशिवाय आपापल्या घरी गेले.
शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका एका निष्पाप मुलाला सहन करावा लागला, तो वर्गात एकटाच राहिला. संध्याकाळपर्यंत मुलगा घरी न परतल्याने कुटुंबाची चिंता वाढली. त्यांनी मुलाचा शोध सुरू केला आणि शाळेजवळ पोहोचले. तिथून मुलाच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमले आणि शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
वर्गाच्या खिडकीच्या लोखंडी ग्रिलमध्ये एक मुलगा अडकलेला पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. स्थानिक लोकांच्या मदतीने मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पालक आणि स्थानिक लोकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.