पळून गेलेल्या मुलीला समजावून घरी आणलं अन् संपवलं; बाथरुमधील दृष्य पाहून गावकरी हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:41 IST2025-04-10T17:36:22+5:302025-04-10T17:41:21+5:30

बिहारमध्ये जन्मदात्या पित्यानेच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bihar Girl who ran away from home due to love affair was strangled to death | पळून गेलेल्या मुलीला समजावून घरी आणलं अन् संपवलं; बाथरुमधील दृष्य पाहून गावकरी हादरले

पळून गेलेल्या मुलीला समजावून घरी आणलं अन् संपवलं; बाथरुमधील दृष्य पाहून गावकरी हादरले

Bihar Crime:बिहारच्या समस्तीपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या २५ वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली. आरोपी बापानेच मुलीचा मृतदेह तीन दिवस बाथरूममध्ये लपवून ठेवला. प्रियकरासोबत पळून गेल्यामुळे जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीची हत्या केल्याचे समोर आलं. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणात आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना समस्तीपूर जिल्ह्यातील मोहिउद्दीननगर येथील टाडा गावात घडली. आरोपीचे नाव मुकेश सिंह आहे तर मृत मुलीचे नाव साक्षी आहे.  पोलिसांनी आरोपी मुकेश सिंहलाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी काही दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून गेली होती. यानंतर मुकेश सिंहला कळले की त्यांची मुलगी दिल्लीत आहे. नंतर मुकेश सिंहने मुलीशी संपर्क साधला आणि तिला विश्वासात घेऊन सांगितले की तू जर घरी परत आलीस तर काही करणार नाही. मात्र मुकेश सिंहच्या मनात दुसरेच काहीतरी चालू होते. गावात अब्रु गेल्याचे वाटून त्याने साक्षीला संपवण्याचा निर्णय घेतला.

साक्षी घरी आल्यावर मुकेश सिंहने तिचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपी मुकेश सिंहने साक्षीचा मृतदेह अनेक दिवस बाथरूममध्ये बंद करून ठेवला होता. आरोपीच्या पत्नीने नंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि सगळा प्रकार उघडकीस आला. पत्नीने मुलीबाबत विचारले असता आरोपी पतीने साक्षी पुन्हा घरातून निघून गेल्याचे सांगितले होते. मात्र बंद बाथरुममधून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहिले असता साक्षीचा मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

साक्षी ४ मार्च रोजी शेजारच्या गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याने दिल्लीला पळून गेली होती. त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरुन साक्षी आठवड्यापूर्वीच दिल्लीहून मोहिउद्दीननगरला आली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. साक्षीच्या आईला संशय आल्यावर तिने मुकेश सिंहला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने ती पुन्हा पळून गेल्याचे सांगितले. साक्षीच्या आईने तिच्या मामाला हा सगळा प्रकार सांगितला. साक्षीच्या मामाला संशय आल्याने त्याने विचारणा केली असता मुकेश सिंह उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागला. पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
 

Web Title: Bihar Girl who ran away from home due to love affair was strangled to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.