घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:45 IST2025-10-11T05:45:35+5:302025-10-11T05:45:49+5:30
ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, या प्रक्रियेत गोपनीयता पाळली जाईल.

घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बिहारच्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या, किंपर घुंगट घालून घेणाऱ्या महिला मतदारांची ओळख पटवली जात असताना त्यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचू नये म्हणून निवडणूक आयोग विशेष व्यवस्था करणार आहे. यानुसार, अशा महिलांची ओळख पटविताना महिला मतदान अधिकारी किंवा स्वयंसेविकांच्या उपस्थितीत अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.
ही ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असून, या प्रक्रियेत गोपनीयता पाळली जाईल. सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बुरखाधारी महिलांची ओळख पटविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाईल, असे जाहीर केले होते.
ओळख पटविण्याच्या या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी जाहीर केले होते. यासाठी राज्यात ९०,७१२ अंगणवाडी सेविकांना निवडणूक ड्युटीवर तैनात करण्यात येणार आहे. गेल्या शनिवारी भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी बुरखाधारी महिलांचे चेहरे त्यांच्या आधार कार्डशी पडताळले जावेत, अशी मागणी केली होती. बिहारमध्ये २४३ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यांत ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
काँग्रेस, राजदमध्ये जागावाटपावरून मतभेद
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सीट वाटपाच्या मुद्द्यावरून महागठबंधनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यात जागा वाटपावरून तीव्र मतभेद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणत्याही स्थितीत दुय्यम भूमिका स्वीकारायची नाही, असा निश्चय काँग्रेसने केला आहे. राजदइतक्या जागा काँग्रेस लढविणार नसला तरी तो पक्ष बिहारमध्ये आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेस आता जिथे विजयाची शक्यता जास्त आहे, अशाच जागांवर हक्क सांगत आहे
नितीशकुमार यांना धक्का
राजकीय हालचालींमध्ये पक्षांतराचा खेळ वेग घेत आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याआधीच जेडीयूला मोठा धक्का बसला आहे.
संतोष कुशवाहा हे दोन वेळ खासदार झालेले तसेच नितीशकुमार यांचे निकटवर्तीय संजय कुशवाहा, माजी खासदार जगदीश शर्मा यांचे पुत्र व माजी आमदार राहुल शर्मा, बांका येथील विद्यमान जेडीयू खासदार गिरधारी यादव यांचे पुत्र राहुल शर्मा चाणक्य प्रकाश आदी नेते राजदमध्ये सामील झालेत.