मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:52 IST2025-11-16T17:51:26+5:302025-11-16T17:52:07+5:30
Bihar Election Story: बिहार निवडणुकीत आरजेडीला त्यांच्या मित्रपक्षांसह केवळ ३५ जागांवर यश मिळाले, तर आरजेडीने स्वतः २७ जागा जिंकल्या.

मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला मिळालेल्या दारुण पराभवानंतर, पक्षामधील असंतोष आणि अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे. लालू प्रसाद यांच्या घरातच मोठा वाद सुरु झाला आहे. अशातच तिकीट नाकारल्यानंतर गेल्या महिन्यात कपडे फाडून, रस्त्यावर लोटांगण घेत रडणारे आरजेडीचे जुने नेते मदन शाह यांनी पक्षाच्या पराभवावर धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, तिकीट न मिळाल्याने झालेल्या वेदनेतून बाहेर पडून त्यांनी आरजेडीला २५ जागांपर्यंतच मर्यादित राहण्याचा शाप दिला होता आणि तो खरा ठरला आहे.
वास्तविक पाहता, बिहार निवडणुकीत आरजेडीला त्यांच्या मित्रपक्षांसह केवळ ३५ जागांवर यश मिळाले, तर आरजेडीने स्वतः २७ जागा जिंकल्या.
मदन शाह यांनी एका वृत्तसंस्थेला ही मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "तिकीट नाकारल्यानंतर झालेल्या वेदनांनी मला वेड लावले होते. मी पाटण्यामध्ये लालूंना भेटायला गेलो, पण कोणीही भेटले नाही. या दुःखातून मी माझे कपडे फाडले आणि जमिनीवर लोळलो."
'२.७ कोटी' रुपयांची मागणी
शाह यांनी पुन्हा एकदा तिकीट वाटपात झालेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. ते म्हणाले की, त्यांच्याकडून तिकीटासाठी २.७ कोटी रुपये मागितले गेले होते. "ही मागणी माझ्याकडे थेट केली नाही, पण मोठ्या नेत्यांनी ही मागणी केली होती. मी १९९० पासून पक्षासाठी काम करत आहे, मग मी तिकीटासाठी पैसे का देऊ?"
शाह यांनी संजय यादव यांचे नाव न घेता, 'तथाकथित चाणक्य' पक्षाला उद्ध्वस्त करत आहेत, असे म्हटले. या पराभवामागील कारणे सांगताना मदन शाह यांनी थेट पक्ष नेतृत्वावर टीका केली. "यावेळी लालूंशी तिकीट वाटपावर सल्लामसलत केली गेली नाही. पक्षाच्या पराभवाचे दुःख आहे, पण देव जे करतो ते चांगल्यासाठीच," असे भावनिक विधान त्यांनी केले.