बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:37 IST2025-11-14T12:36:57+5:302025-11-14T12:37:53+5:30
Bihar Election Latest News: बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरली आहे.

बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
बिहारमध्ये एनडीएने हरियाणा, महाराष्ट्र, दिल्लीसारखीच मोठी कामगिरी करून दाखविली आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीएला १८६ जागांवर आघाडी मिळाली असून तेजस्वी यादव यांचे महागठबंधन ४९ जागांवर येऊन ठेपले आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरू लागली आहे. तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघात पाचव्या फेरीत केवळ १०५ मतांनी पिछाडीवर गेले आहेत.
बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिले जात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी राघोपूरची लढत चुरशीची ठरली आहे. पाचव्या फेरीअखेर त्यांना भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांच्याकडून केवळ १०५ मतांनी पिछाडीवर राहावे लागले आहे. ही अत्यंत कमी मतांची तफावत पाहता, राघोपूरमध्ये निकालासाठी मतदारांना आणि राजकीय निरीक्षकांना शेवटपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाआघाडीसाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.
विजय सिन्हांचा 'जलवा' कायम; लखीसरायमध्ये मोठा फरक
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी लखीसराय मतदारसंघात आपली पकड मजबूत ठेवली आहे. पाचव्या फेरीनंतर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर ५३९६ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. त्यांची ही आघाडी पाहता, लखीसरायचा गड त्यांच्यासाठी सुरक्षित असल्याचे दिसत आहे.
भाकपा मालेची घोसीमध्ये दमदार एंट्री!
जहानाबाद जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातील चित्र लक्षणीय आहे. येथे भाकपा मालेच्या उमेदवाराने पाचव्या फेरीत तब्बल ६२०५ मतांची मोठी आघाडी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले आहे. हा विजय भाकपा मालेच्या वाढत्या ताकदीचे संकेत देत आहे.