बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश-तेजस्वी यांच्या सत्तेचे भविष्य 'या' ६ जागांच्या निकालावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 10:48 IST2025-11-14T10:44:25+5:302025-11-14T10:48:53+5:30
बिहार निवडणुकीच्या निकालाचे कल समोर आले आहेत मात्र त्यातील सहा जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

बिहारमध्ये सत्ता कोणाची? नितीश-तेजस्वी यांच्या सत्तेचे भविष्य 'या' ६ जागांच्या निकालावर
Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यात (६ आणि ११ नोव्हेंबर) झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार असून, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा निकाल निर्णायक मानला जात आहे. या मतदारसंघांचा इतिहास सांगतो की या जागांवर जो पक्ष जिंकेल, पाटण्यामध्ये त्याचीच सत्ता स्थापन होईल.
या सहा निर्णायक जागांच्या यादीत सर्वात पहिले नाव मधुबनी जिल्ह्यातील केवटी विधानसभा मतदारसंघाचे आहे. या जागेचा ट्रॅक रेकॉर्ड जवळपास १०० टक्के अचूक आहे.१९७७ पासून आजपर्यंत या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे, त्याच पक्षाची किंवा आघाडीची सत्ता राज्यात स्थापन झाली आहे. १९७७ मध्ये जनता पक्षाची, ८० आणि ८५ मध्ये काँग्रेसची, त्यानंतर जनता दल आणि आरजेडीच्या उमेदवारांचा या जागांवर विजय झाला आणि राज्यांत त्यांच्याच पक्षाची सत्ता आली.
२००५ आणि २०१० मध्ये भाजप जिंकली, तेव्हा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेत होती. केवटीमध्ये २०१५ साली आरजेडी जिंकली आणि आरजेडी-जेडीयू-काँग्रेसचे महागठबंधन सत्तेत आले. सध्या भाजपचे मुरारी मोहन झा विद्यमान आमदार असून, त्यांचा सामना आरजेडीचे उमेदवार फराझ फातमी यांच्याशी होत आहे.
त्याचप्रमाणे, राज्यात सरकार कोण बनवणार यात सहरसा मतदारसंघही निर्णायक ठरला आहे. १९७७ पूर्वी, काँग्रेस पक्षाने ही जागा सातत्याने जिंकली आणि त्या पक्षाने राज्यात सातत्याने सरकार स्थापन केले. १९७७ मध्ये, जनता पक्षाचे शंकर प्रसाद टेकरीवाल विजयी झाले आणि जनता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले. १९८० आणि १९८५ मध्ये, काँग्रेसचे रमेश झा आणि सतीश चंद्र झा पुन्हा विजयी झाले आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. १९९० ते २००० पर्यंत, टेकरीवाल यांनी जनता दल आणि आरजेडीच्या तिकिटावर येथून पुन्हा विजय मिळवला. राज्यात त्याच पक्षाने सरकार स्थापन केले आणि टेकरीवाल लालू-राबडी सरकारमध्ये मंत्री झाले. २००५ आणि २०१० मध्ये भाजपने येथे विजय मिळवला. २०१५ मध्ये आरजेडी आणि २०२० मध्ये पुन्हा भाजपने ही जागा जिंकली. सध्या, भाजपचे विद्यमान आमदार आलोक रंजन झा आहेत. झा पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. महाआघाडीतील आयआयपीच्या इंद्रजीत गुप्ता यांच्याशी त्यांची लढत आहे.
मुजफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा विधानसभा मतदारसंघही खूप महत्त्वाचा आहे. १९७७ नंतर येथे केवळ एकदाच गडबड झाली. बाकी, प्रत्येक वेळी येथे विजयी झालेला पक्षच पाटण्यातील सत्तेत बसला आहे. इतर तीन टर्निंग पॉइंट जागायाशिवाय, मुंगेर विधानसभा जागेवरही १९८५ मध्ये एकदाच अपवाद वगळता, येथे जिंकणारा पक्ष सत्तेत आला आहे. मुंगेरचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे प्रणय कुमार यादव करत आहेत. तसेच, पूर्वी चंपारणची पिपरा ही एक जागा आहे जिथे २०१५ मध्ये केवळ एकदाच गडबड झाली होता. येथे भाजप जिंकली, पण राज्यात महागठबंधनचे सरकार बनले.
शेखपुरा जिल्ह्यातील बरबीघा ही एक आणखी महत्त्वाची जागा आहे, जी १९७७ पासून सत्तेसाठी महत्त्वाची ठरली आहे. २०१५ तसेच २०२० मध्ये जेडीयूने येथे विजय मिळवला आहे. या सहा जागांचे निकाल हे केवळ मतदारसंघाचे भवितव्य नव्हे, तर बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार की तेजस्वी यादव सत्ता काबीज करणार, याचे स्पष्ट संकेत देतील. मतमोजणी जसजशी पुढे सरकेल, तसतसे या महत्त्वाच्या जागांवर कोणाचा विजय होतो, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.