बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:06 IST2025-11-16T11:05:50+5:302025-11-16T11:06:57+5:30
Prashant Kishor, Bihar Election Results: बिहार निवडणुकीत काँग्रेस, आरजेडीपेक्षाही जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला

बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
Prashant Kishor, Bihar Election Results: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-जेडीयूने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, काँग्रेस, आरजेडी आणि जनसुराज पक्षाला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत सरकार स्थापन करण्याचे आश्वासन देणारे प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना त्यांच्या पक्षाचे खातेही उघडता आले नाही. निवडणूक निकालानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधणार होते. पण, शेवटच्या क्षणी त्यांना पत्रकार परिषद रद्द केली. त्यामुळे, प्रशांत किशोर यांच्याकडे उत्तर देण्यासारखे काहीही शिल्लक नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
आधी घोषणा, मग रद्द
जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आज १६ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. ही पत्रकार परिषद विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि जनसुराजच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी नियोजित होती, परंतु आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. जनसुराजने ही निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती, तरीही त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
अजूनही प्रशांत किशोर यांच्यावर लक्ष
निवडणूक रणनितीकार म्हणून लौकिक असल्याने, निवडणूक निकालानंतर सर्वांच्या नजरा प्रशांत किशोर यांच्या पत्रकार परिषदेवर आहेत. प्रशांत त्यांच्या राजकारणाबाबत आणि त्यांच्या विधानांबाबत पुढील पावले काय उचलतात हे पाहणे बाकी आहे. पीके यांनी त्यांची पत्रकार परिषद पुढे ढकलली असली तरी, लोक अजूनही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
उमेदवारांना डिपॉझिट वाचवणंही झालं अशक्य
प्रशांत किशोर गेल्या तीन वर्षांपासून बिहार निवडणुकीसाठी कठोर परिश्रम करत आहेत. त्यांनी राज्यातील २४३ पैकी २३९ जागांवर निवडणूक लढवली. त्यांच्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या मध्यातच पक्ष बदलला. जवळजवळ प्रत्येक जागेवर प्रचार करूनही प्रशांत किशोर यांना एकही जागा जिंकता आली नाही. बहुतेक उमेदवारांचे तर डिपॉझिटही जप्त झाले.