ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 10:37 IST2025-11-15T10:36:05+5:302025-11-15T10:37:10+5:30
सीतामढी मतदारसंघात मागील ४ निवडणुकीचा इतिहास पाहिला तर याठिकाणी ३ वेळा भाजपा आणि एक वेळा आरजेडीचा विजय झाला आहे

ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेत. त्यात काही जण निवडणुकीच्या प्रचारात वादात सापडले होते. यातीलच एक भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू यांचा अश्लील व्हिडिओ प्रचारावेळी व्हायरल झाला होता. या व्हिडिओचा आधार घेत विरोधकांनी पिंटू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. परंतु बिहारी जनतेने सुनील कुमार पिंटू यांना साथ देत निवडून आणले आहे.
बिहारच्या सीतामढी विधानसभा मतदारसंघात भाजपाने आरजेडीला दुसऱ्यांदा मात देत हा मतदारसंघात ताब्यात ठेवला आहे. या मतदारसंघात भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू यांनी आरजेडी उमेदवाराला ५५६२ मताधिक्यांनी पराभूत केले आहे. सुनील कुमार पिंटू यांना १ लाख ४ हजार २२६ मते पडली आहेत तर आरजेडी उमेदवार सुनील कुमार यांना ९८ हजार ६६४ मते पडली आहेत. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा भाजपाचे सुनील कुमार पिंटू पिछाडीवर होते. पहिल्या फेरीत आरजेडी उमेदवार भाजपापेक्षा पुढे होते. दुसऱ्या फेरीतही आरजेडी उमेदवार सुनील कुमार १४७७ मतांनी पुढे होते. मात्र चौथ्या फेरीत भाजपाने आरजेडी उमेदवाराला मागे टाकत आघाडी घेतली. मतमोजणीच्या एकूण २६ फेरीनंतर भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू ५ हजार ५६२ मतांनी पुढे राहत विजयी झाले.
सीतामढी मतदारसंघात मागील ४ निवडणुकीचा इतिहास पाहिला तर याठिकाणी ३ वेळा भाजपा आणि एक वेळा आरजेडीचा विजय झाला आहे. २००० साली या मतदारसंघात आरजेडीचा विजय झाला होता. १९९० पासून या जागेवर जनता दलाचा कब्जा होता. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मिथिलेश कुमार यांनी आरजेडी उमेदवार सुनील कुमार यांना ११ हजार ४७५ मतांनी हरवले होते. २०१५ च्या निवडणुकीत आरजेडी उमेदवार सुनील कुमार यांनी हा मतदारसंघ भाजपाकडून ताब्यात घेतला होता. त्यांनी भाजपाचे सुनील कुमार पिंटू यांचा पराभव केला होता.
सुनील कुमार पिंटू वादात
बिहार निवडणुकीचा प्रचार सुरू असताना भाजपा उमेदवार सुनील कुमार पिंटू यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने ते वादात अडकले. सुनील कुमार पिंटू यांच्या प्रचाराला स्वत: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पोहचले होते, त्यांनी सुनील कुमार पिंटू मोठा माणूस बनणार आहे असं सांगत लोकांनी त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर काही दिवसांत सुनील कुमार पिंटू यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना ते दिसून आले. दुसऱ्या व्हिडिओत नग्नावस्थेत व्हिडिओ कॉलवरून मुलीशी संवाद साधत असल्याचे दिसून आले. मात्र हा विरोधकांचा राजकीय डाव आहे. मला बदनाम करण्यासाठी हे व्हिडिओ व्हायरल केलेत असा आरोप भाजपाचे सुनील कुमार पिंटू यांनी केला होता. प्रचारावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सुनील कुमार पिंटू यांना मतदानात फटका बसेल असं बोलले जात होते. परंतु सीतामढीच्या जनतेने सुनील कुमार पिंटू यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे.