अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 15:02 IST2025-10-19T15:01:50+5:302025-10-19T15:02:58+5:30

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अर्ज दाखल करायला निघालेल्या माजी मंत्र्याच्या मुलाने माघार घेतली.

Bihar Election Rebel BJP Leader Son Reaches to File Nomination But One Phone Call Changes Everything | अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

अपक्ष उमेदवारीचा अर्ज तयार, पण ऐनवेळी 'तो' एक फोन आला; भाजप नेत्याच्या मुलाने भागलपूरमधून घेतली माघार

Bihar Elections 2025: बिहारमधील भागलपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून सुरु झालेले नाटक एका फोनमुळे संपले. माजी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांचे पुत्र अर्जित शाश्वत चौबे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय मागे घेतला. भाजपने रोहित पांडे यांना तिकीट दिल्यानंतर संतप्त झालेल्या अर्जित चौबेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी वडिलांच्या एका फोनने त्यांना आपला निर्णय बदलण्यास भाग पाडले.

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या अर्जित चौबे हे गुरुवारी मोठ्या संख्येने समर्थकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी चौबे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू होती. चौबे अर्ज दाखल करणार, हे निश्चित असतानाच, ऐनवेळी त्यांचा फोन वाजला आणि संपूर्ण परिस्थिती बदलली. माध्यमांशी बोलत असतानाच त्यांनी फोन उचलला आणि तातडीने अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला. हा आदेश खुद्द त्यांचे वडील अश्विनी चौबे यांचा होता.

४३ वर्षीय अर्जित चौबे यांनी वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माध्यमांना सांगितले की, "माझ्या  निवडणूक लढवण्याच्या घोषणेनंतर पक्षाच्या आणि देशाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा माझ्यावर सातत्याने दबाव होता. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने माझ्या वडिलांशी आणि आईशीही संवाद साधला होता. मी त्यांची आज्ञा कशी मोडू शकतो? मी माझ्या पक्षाविरोधात आणि देशाविरोधात बंडखोरी करू शकत नाही."

भाजपने रोहित पांडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर हे राजकीय नाट्य सुरू झाले होते. पांडे यांनी २०२० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अजित शर्मा यांच्याकडून निसटता पराभव पत्करला होता. त्यामुळे भागलपूरच्या जागेवर आपण दावेदार आहोत, असे अर्जित चौबे यांना वाटत होते. पण, पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम मानून, वडिलांच्या एका शब्दाने चौबेंनी आपले बंडाचे निशाण खाली ठेवले. त्यामुळे भागलपूरमधील ही लढत आता भाजपच्या विरोधात असणारी चौबेंची बंडखोरी टळल्यामुळे भाजपच्या दृष्टीने एक मोठा दिलासा मानला जात आहे. 
 

Web Title: Bihar Election Rebel BJP Leader Son Reaches to File Nomination But One Phone Call Changes Everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.