तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:14 IST2025-11-17T17:14:28+5:302025-11-17T17:14:56+5:30
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाची महत्त्वाची बैठक आज दुपारी २ वाजता तेजस्वी यादव यांच्या '१ पोलो रोड' येथील निवासस्थानी पार पडली. या बैठकीत नवनिर्वाचित आमदारांनी तेजस्वी यादव यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत त्यांची एकमताने आरजेडी विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली. परंतू, ही बैठक अर्धवटच सोडून लालू प्रसाद यादव आणि राबडीदेवी आपल्या निवासस्थानी निघून गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत केवळ नवनिर्वाचित आमदारच नव्हे, तर निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलावण्यात आले होते. पक्षाच्या दारुण पराभवाची सखोल समीक्षा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, पक्षाचे संस्थापक लालू प्रसाद यादव आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बैठक पूर्ण होण्यापूर्वीच तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे, पराभवाच्या कारणांवर चिंतन करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक अर्धवट सोडल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीत पराभवाची कारणे आणि भविष्यातील पक्षाची रणनीती यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.
रविवारीच लालू प्रसाद यादव यांच्या चारही मुलींनी घर सोडले होते. मोठी मुलगी रोहिणी हिच्यावर तेजस्वी यादवांनी चप्पल फेकली होती. तसेच लालू यांना खराब झालेली किडनी दिल्याच आरोप करत त्यांना घरातून बाहेर काढले होते. यानंतर अन्य तीन मुलींनी देखील घर सोडत दिल्ली गाठली आहे.