चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:33 IST2025-10-10T05:33:33+5:302025-10-10T05:33:58+5:30
Bihar Election Politics: बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली.

चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले
- चंद्रशेखर बर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वयंघोषित ‘हनुमान’ चिराग पासवान ‘रुसून’ बसल्यामुळे रालोआतील जागावाटपाचा मुद्दा रेंगाळत चालला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, प्रभारी महासचिव विनोद तावडे, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे चिराग पासवान यांची समजून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज पक्षाच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर केली. इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. परंतु, लोक जनशक्ती पार्टीचे (आर) चिराग पासवान आपल्या मागण्यांवर अडून बसल्यामुळे रालोआत जागा वाटपाची चर्चा सुरू होऊ शकली नाही. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी ४० जागांची मागणी केली आहे. भाजपला मात्र ते मान्य नाही.
हिशेब चुकता करायचा आहे
मुख्यमंत्री नितीशकुमार यांना जुना हिशेब बरोबर करायचा आहे.
२०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उतरविले होते.
नितीशकुमार यांना परतफेड करायची आहे.
लोजपाला जादा जागा सोडाव्या लागल्या तर त्या भाजपने आपल्या कोट्यातून सोडाव्यात. जेडीयू एकही जागा कमी करणार नाही, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मतदारसंघाबाबत तडजोड नाही
महत्त्वाचे म्हणजे, लोजपाला थोड्या जागा कमी मिळाल्या तरी चालतील. मात्र, आवडीच्या मतदारसंघात कोणत्याही प्रकारचा समझोता करायला पासवान तयार नाहीत.
लोजपाच्या यादीत काही असे मतदारसंघ आहेत, जेथे रालोआतील घटक पक्षांचे आमदार आहेत. यातही चिराग पासवान भाजप नेत्यांशी चर्चा करण्याचे टाळत असल्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. यामुळे भाजप नेते भाजप नेते सतत त्यांची भेट घेत आहेत.
माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे लढणार निवडणूक
बिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी बिहार निवडणुकांमध्ये दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी जमालपूर आणि अररिया या दोन विधानसभा मतदारसंघांतून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी एप्रिल २०२४ मध्ये स्थापन केलेली ‘हिंद सेना’ ही राजकीय पार्टी अद्याप निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत झालेली नाही. लांडे यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.