निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:28 IST2025-11-20T17:27:56+5:302025-11-20T17:28:18+5:30
दीपक प्रकाश हे सध्या बिहार विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य नाहीत. नियमानुसार, त्यांना मंत्रिपदावर राहण्यासाठी येत्या सहा महिन्यांच्या आत आमदार किंवा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून यावे लागेल.

निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
पाटणा: बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने गुरुवारी शपथ घेतली, ज्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एकूण २७ मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्रिमंडळात एक नाव असे आहे, ज्याची राजकीय एन्ट्री सर्वाधिक चर्चेत आहे. ते म्हणजे राष्ट्रीय लोक मोर्चेचे (रालोमो) नेते उपेंद्र कुशवाहा यांचे पूत्र दीपक प्रकाश. दीपक प्रकाश यांनी कोणतीही निवडणूक न लढवता थेट मंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
दीपक प्रकाश हे सध्या बिहार विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे सदस्य नाहीत. नियमानुसार, त्यांना मंत्रिपदावर राहण्यासाठी येत्या सहा महिन्यांच्या आत आमदार किंवा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून यावे लागेल. निवडणुकीत रालोमोला एनडीएत ६ जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी ४ जागांवर विजय मिळाला. मात्र, कुशवाहा यांनी आपल्या विद्यमान आमदारांना बाजूला ठेवून मुलाला मंत्री बनवले आहे.
शपथविधी समारंभात बहुतांश नेते पारंपरिक कुर्ता परिधान करून आले होते, पण दीपक प्रकाश यांनी जीन्स आणि पांढरा शर्ट परिधान केला होता. त्यांच्या या पोशाखामुळे मंत्रिमंडळात 'युवा' प्रतिमेचा संदेश पोहोचवल्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळात उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता यांनी देखील सासाराममधून विजय मिळवून आमदार झाल्या आहेत. दीपक प्रकाश यांच्या माध्यमातून कुशवाहा यांनी आता आपल्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला सक्रिय राजकारणात आणले आहे.